वर्धा : २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोंबर हा काळ पितृमोक्ष पंधरवाडा म्हणून पाळल्या जात आहे. या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, महालय आदी विधी करण्याची धार्मिक परंपरा आहे. पण पूर्वजांची मृत्यूतिथीच माहीत नसण्याची पण काहींना अडचण असते. अश्या वेळी शास्त्र, कुळाचार, प्रथा स्मरून करीत विधी होतात. त्यावर पुढील उपाय सांगण्यात आले आहे.
१) मृत्यू तिथी माहीत नाही पण मृत्यू झालेला महिना माहीत असेल तर त्या महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२) मृत्यू तिथी किंवा महीना कांहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महीन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
३) एखादि व्यक्ती घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही, कांहीच वार्ता लागली नाही तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला श्राद्ध करावे.
४) एखादी व्यक्ती घरातून निघुन गेली आणि कधी मृत झाली ते कळले नाही मात्र मृत झाली आहे ही बातमी ज्या तिथीला कळेल त्या तिथीला श्राद्ध करावे.
५) एखादी व्यक्ती घरातून निघुन गेली , शोध लागला नाही तर पंधरा वर्ष वाट पहावी. पंधरा वर्षात आला नाही तर त्याची प्रतिमा करुन त्यावर अंत्य विधी करावा, चवदाव्या दिवसा पर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत व प्रतिमेला अग्नी दिला ती तिथी धरावी.
६) पंधरा वर्ष वाट पाहुन मृत झाला असे समजुन अंत्यविधी क्रियाकर्म केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधी घरी आली तर त्याचा पुनर्जन्म झाला असे समजून त्याचा जातकर्म विधी करुन त्याला व्यवहारात घ्यावे.
७) श्राद्धाच्या दिवशी सोयर किंवा सूतक असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोब श्राद्ध करावे.किंवा त्या महिन्याच्या एकादशीला अथवा अमावास्येला श्राद्ध करावे अथवा पुढील महीन्याच्या त्याच तिथीला करावे.
८) श्राद्ध करणाऱ्यांच्या पत्नीला मासिक पाळीची अडचण आली असेल तर पिण्ड न करता श्राद्ध करावे किंवा पाचव्या दिवशी श्राद्ध करावे आणि महालय श्राद्ध असेल तर ते पुढे ढकलावे.( महालय श्राद्ध दिवाळी पर्यंत केंव्हाही करता येते.)
९) पत्नी नसल्यास अथवा तुम्ही प्रवासात असाल तर शिधा द्यावा अथवा हिरण्यश्राद्ध करावे म्हणजे नुसती दक्षिणा द्यावी.