दिवंगत पोलीस शिपायाचा मुलगा मुख्य सूत्रधार
रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभ्या मद्यपी तरुणांना हटकल्याने पोलिसाच्या अंगावर दुचाकी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात गिट्टीखदान पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी हा दिवंगत पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.
स्वप्निल हिवराज सावरकर (२४) रा. गिऱ्हे लेआऊट, झिंगाबाई टाकळी, व्यंकेश सिद्धार्थ तिरपुडे (३०) रा. सुरेंद्रनगर आणि राजेश शेषराव धवस (२८) रा. बोरगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वप्निल याचे वडील पोलीस विभागात कार्यरत होते. गेल्या २० सप्टेंबर, शुक्रवारी रात्री गिट्टीखदान पोलीस हद्दीत पोलीस लाईन टाकळी परिसरात ही घटना घडली होती. अनिल चक्रे रा. पोलीस लाईन टाकळी, असे जखमीचे नाव आहे. चक्रेपोलीस मुख्यालयात हवालदार आहेत. शुक्रवारी रात्री कर्तव्य बजावून ते घरी जात होते. याचवेळी प्रफुल्ल राठोड व त्याचे मित्र बोलत उभे होते. चक्रे प्रफुल्ल यांच्याजवळ थांबले. तेही प्रफुल्लसोबत बोलायला लागले. दरम्यान, काही अंतरावर तीन अनोळखी युवक रस्त्यावर उभे राहून दारू पित होते. चक्रे यांनी त्यांना हटकले. त्यावेळी तिघांनीही चक्रे यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावर दुचाकी चढवून खून करण्याचा प्रयत्न केला. प्रफु ल्ल चक्रे यांच्या मदतीसाठी धावला.
आरोपींनी प्रफुल्ल यांनाही शिवीगाळ केली. ते पळाले. त्यानंतर आरोपीही निघून गेले. प्रफु ल्ल यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक साजीद अहमद, युवराज ढोले व इतरांनी तपास करून तिघांना अटक केली. त्यात स्वप्निल हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी पोलिसांसमोर गुन्ह्य़ाची कबुली दिली.
तीन दिवसांपूर्वी वडिलांचा मृत्यू
स्वप्निलचे वडील हिवराज हे मानकापूर पोलीस ठाण्यात नायक शिपाई म्हणून कार्यरत होते. अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. कौटुंबिक कलहामुळे स्वप्निल हा आपल्या आईसह वडिलांपासून वेगळा राहायचा. स्वप्निलचा स्वभाव तापट स्वरूपाचा असून त्यानेच चक्रे यांना मारहाण करण्यात पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते.
सुरक्षा महामंडळात कार्यरत
तीनही आरोपी अनेक वर्षांपासून पोलीस भरतीची परीक्षा देत आहेत. पण, काही गुणांनी ते कमी पडले. त्यामुळे त्यांची निवड महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात झाली. आरोपी नेहमी पोलीस लाईन टाकळी परिसरातील तलावाच्या परिसरात बसून दारू पित होते, असे कळते.