हजारो विद्यार्थी अद्याप प्रतीक्षेतच

नागपूर : करोनामुळे आधीच शैक्षणिक सत्र लांबले असतानाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू  केलेली नाही. पदवी अंतिम वर्षाचे बहुतांश निकाल जाहीर झाले असतानाही प्रवेश प्रक्रिया सुरू का झाली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पदव्युत्तर प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने घेतली जाते. यामध्ये विद्यापीठाचे पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांमधील प्रवेशाचा समावेश आहे. मात्र, या प्रक्रियेस होणाऱ्या उशिरामुळे खासगी महाविद्यालयांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही उमटले होते. त्यामुळे केवळ विद्यापीठाच्या विविध विभागांमधील प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून घेण्याचे ठरले. यावर्षी खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप विद्यापीठाकडून कुठल्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, परीक्षा विभागाकडून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.एस.डब्ल्यू. यासह जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाचे निकाल लावण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच विद्यापीठ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक येण्याची शक्यता आहे.

 

अंतिम वर्षाच्या जवळपास सर्वच अभ्यासक्रमांच्या निकालाची घोषणा करण्यात आलेली आहे. तांत्रिक कारणामुळे जे विद्यार्थी परीक्षेला मुकले होते त्यांचीही परीक्षा घेतली आहे. त्यांचे निकाल या महिन्याच्या अखेरपर्यंत घोषित होतील. -डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.