scorecardresearch

हजारो नागरिक रात्रभर विजेविना ! ऊर्जामंत्र्यांच्या शहरात विजेचा लपंडाव सुरूच 

महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्यातील ८० टक्के ग्राहकांना एक ते दीड तास विजेविना रहावे लागले

निर्मल नगर परिसरातील वीज वाहिनीची दुरुस्ती करताना महावितरण कर्मचारी.

नागपूर : ऊर्जामंत्र्यांचे शहर असलेल्या उपराजधानीत वीज यंत्रणेवर अतिरिक्त ताण वाढल्याने शहरातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. बुधवारी मध्यरात्री वाठोडा परिसरात तांत्रिक बिघाडाने २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मानेवाडय़ातही वीज गेली. हजारो ग्राहक रात्रभर उकाडा सहन करीत होते.

महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्यातील ८० टक्के ग्राहकांना एक ते दीड तास विजेविना रहावे लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीच संताप असताना सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही मध्यरात्री महावितरणच्या निर्मल नगर उपकेंद्रातून वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही क्षमतेच्या भूमिगत वाहिनीत (केबल) बिघाड झाला.

यामुळे त्या भागातील एका फीडरवरील ग्राहकांचा पुरवठा प्रभावित झाला. ही माहिती महावितरण अधिकाऱ्यांना कळल्यावर इतर वाहिनीवर हा भार टाकण्यात आला. परिणामी, मानेवाडा, सोमवारी क्वार्टर भागातील वीजपुरवठा सुमारे एक ते दीड  तास प्रभावित झाला. सोबत वाठोडा उपकेंद्रातील १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये रात्री ११.३६ च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळे वाठोडा, हिवरी नगर, अनमोल नगर  या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे अनेकांना रात्रभर विजेविना रहावे लागले.

महावितरण म्हणते, संयम बाळगा!

शहरातील सुमारे १३ लाख ग्राहकांना महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र प्रचंड वाढलेले तापमान तसेच  वीज यंत्रणेवर वाढलेला ताण यामुळे महावितरणला मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीच्या काळात ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.

भाजपचे आंदोलन

हिवरी नगर, वाठोडा पावर स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात सातत्याने  वीज खंडित होत  असल्याचा आरोप करत भाजपने आंदोलन करीत येथील कनिष्ठ अभियंता जयस्वाल यांना निवेदन दिले. महावितरणकडून भ्रमनध्वनीवर समाधानकारक उत्तर दिले जात नसल्याचा आरोप भाजपचे महामंत्री नरेंद्र बोरकर यांनी केला. तातडीने प्रश्न न सुटल्यास पुढे आणखी तिव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.  याप्रसंगी सुरेंद्र समुंद्रे, राजूभाई आचार्य, राजू बोंद्रे, मनोहर चिकटे, हितेश जोशी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बंटी कुकडे हेसुद्धा वाठोडा उपकेंद्र परिसरात उपोषणाला बसले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Power supply disrupted due to technical failure in vathoda area at midnight zws

ताज्या बातम्या