नागपूर : अमरावती महामार्गावर बाजारगाव येथील सोलार इंडस्ट्री लिमिटेड मध्ये ४ सप्टेंबरला झालेल्या भिषण स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला. यापूर्वीही यापूर्वी सुद्धा १७ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या स्फोटामध्ये नऊ जणांच्या चिंधड्या उडाल्या होत्या. वारंवार होणाऱ्या या घटनांमध्ये कामगारांचे बळी जात असताना पोलीस अज्ञातांवर गुन्हा दाखल करून मोकळे होतात. त्यामुळे आता या वरून प्रहार संघटनेने आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

सात दिवसांत कंपनीचे मालक आणि व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरू अशा इशारा प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन दिला. जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचीही संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर आणि आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेऊन निवेदन सादर करीत सोलर कंपनी मालक आणि व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यापूर्वीही यापूर्वी सुद्धा १७ सप्टेंबर २०२३ ला झालेल्या स्फोटातील जखमींना अद्याप मदत मिळालेली नाही. आता पुन्हा स्फोट झाल्याने कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक याला जबाबदार आहे. या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक हाताळले जात असतात. असे असताना मोठया प्रमाणात  नियमांच उल्लंघन झालेले आहे. सात दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर प्रहार पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही  यातून देण्यात आला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू…

बाजारगावातल्या सोलर कंपनीत आजवर ९ स्फोट झाले. त्यापैकी केवळ ३ चव्हाट्यावर आले. किरकोळ स्फोट दडवले जातात. कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून स्थानिक पोलीस प्रशासनाला दबावाखाली ठेवले आहे. वारंवार होणाऱ्या स्फोटात माणसे जीवानिशी जात असताना कंपनी मालक आणि व्यवस्थापन नैतिक दृष्ट्या जबाबदारी घ्यायला तयार नाही. कंपनीत वारंवार अशा घटना घडत असताना सरकार जर यावरून कंपनी मालकाला जाब विचारत नसेल तर हे गंभीर आहे.  बच्चू कडू, माजी आमदार