नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त एका कैद्याला कारागृह पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर पुन्हा कारागृहात आणले. मात्र, पुन्हा केलेल्या तपासणीत त्याच्याकडे गांजासह भ्रमणध्वनीच्या तब्बल १५ बॅटरी सापडल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. हा मुद्देमाल त्याच्याकडे आला कुठून? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सूरज कन्हैय्यालाल कावळे (२२) रा. खापरखेडा असे कैद्याचे नाव आहे. तो मोक्काचा आरोपी आहे. तो कारागृहात बंद होता. दरम्यान, न्यायालयात तारीख असल्याने त्याला कारागृहातील पोलिसांनी सोमवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान न्यायालयात नेले. दुपारी दीडच्या सुमारास त्याला पून्हा कारागृहात नेण्यात आले.

हेही वाचा : नव्या पिढीमधील पाश्चात्य पदार्थांचा मोह फार काळ टिकणार नाही ; प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मत

दरम्यान, कारागृहात त्याची तपासणी करण्यात आली. परंतु यावेळी सुरक्षा रक्षकांना कैद्याकडे ५५ ग्राम गांजा, भ्रमणध्वनीच्या तब्बल १५ बँट्री आणि १२९ पान विविध पोलीस ठाण्यातील कागदपत्र आढळले. हा प्रकार बघून सुरक्षारक्षकांनी तातडीने वरिष्ठांना सूचना दिली. या प्रकरणाला कारागृह प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून या वस्तू कैद्याकडे आल्या कुठून? याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.