भरपूर कमाईच्या लालसेतून सुरू केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे विद्यार्थीच फिरकत नसल्याने संस्थाचालकांचे आर्थिक गणित बिघडल्याने खासगी महाविद्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा वेतनाचा पेत निर्माण झाला आहे. आता या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही आता वेतनासाठी आंदोलनाचा दंडुका हातात घेऊन नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सद्य:स्थितीत नागपूर विभागात ५५ अभियांत्रिकी महाविद्यालये असून, गेल्या कित्येक महिन्यांपासून वेतनाविना असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनांच्या विरोधातील आंदोलनाची धार तीव्र केली आहे. अभियांत्रिकीची ‘क्रेझ’ कमी झाली नसली तरी अलीकडच्या काही वर्षांमध्ये मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी पदवी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाची अवस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. अभियांत्रिकीला मागणी वाढत असल्याचे लक्षात आल्याबरोबर विना-अनुदानित महाविद्यालयांचे पीक जोमात वाढले. अनुदानित महाविद्यालयांमध्ये नाही पण, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन आणि कर्मचारी संघर्ष गेल्यावर्षीपासून जास्त चिघळला आहे.
विनाअनुदानित महाविद्यालयात पायाभूत सुविधांचा अभाव असूनही अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेला खोटी माहिती देऊन महाविद्यालयांना मान्यता मिळवण्यात निर्ढावलेले संस्थाचालक आतापर्यंत तरी यशस्वी ठरले आहेत. महाविद्यालयात प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ग्रंथालय, ग्रंथपाल, पुस्तके, मैदान, मूलभूत सुविधा, प्रयोगशाळा, त्यातील उपकरणे अशी माहिती केवळ कागदोपत्री दाखवली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जाहिरात देऊनही उच्चशिक्षित मनुष्यबळ मिळत नसले तरी कामचलावू मनुष्यबळावर संस्थेचा डोलारा उभा असतो. अशा कर्मचाऱ्यांना केव्हाही कामावरून कमी करणे शक्य होते. दुसरे म्हणजे एआयसीटीईचा चमू तपासणीसाठी येतो. तेव्हा एका महाविद्यालयातील मनुष्यबळ, पुस्तके, उपकरणे इत्यादी दुसऱ्या महाविद्यालयात हलवून महाविद्यालय सुसज्ज असल्याचा भास निर्माण केला जातो. त्यामुळे वर्षांनुवर्षे पायाभूत सुविधेच्या नावाखाली महाविद्यालयांत आनंदीआनंद असतो. विद्यार्थी प्रवेश घेतात तेव्हा या सर्व सुविधांचा पाढा वाचला जातो परंतु प्रत्यक्षात परिस्थिती भिन्न असल्याचे लक्षात येताच गेल्या काही वर्षांमध्येच अशा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेईनासे झाल्यानेच आज महाविद्यालयीन कर्मचारी थेट संस्थाचालकाच्या घरासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यास धजावले.
तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी राजेंद्र मुळक यांच्या महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वेतन होत नसल्याचे निवेदन सादर करून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक घेऊन वेतन देण्याविषयी तडजोडही करण्यात आली होती. मात्र महाविद्यालयांनी त्यांची नियुक्ती केली नसून करार पद्धतीने हे कर्मचारी काम करीत आहेत आणि अनेकांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.
यासंदर्भात विद्यापीठ न्यायाधीकरणात महाविद्यालयीन प्राध्यापकांची प्रकरणे लढवणारे अॅड. अशोक रघुते म्हणाले, अनेक प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी वेतन मिळत नसल्याच्या कारणास्तव संपर्कात आहेत. प्राध्यापकांनी एकत्र येऊन होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्यास पायाभूत सुविधांचा अभाव असलेली ही विनाअनुदानित महाविद्यालये ताबडतोब बंद होऊ शकतात. पण प्राध्यापक मंडळी भेकड असतात. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधेल, असे विचारत दुसरा कुणी ती घंटा बांधेल का? याची वाट पाहतात. वेतन नसल्याच्या कारणास्तव व्हीएमआयटीमधील १८ जणांच्या प्रकरणात नुकतीच अवमान याचिका दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, मुळक अभियांत्रिकी महाविद्यालय, व्हीएमआयटी, माजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे चंद्रपूर आणि गडचिरोलीतील महाविद्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटून त्यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात दंड थोपटल्याचे दिसून येते. इतरही बहुतेक विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये अशीच अवस्था असून आज ना उद्या कर्मचारी आंदोलन करण्याची शक्यता आहे.
महिनोंमहिने वेतनच मिळाले नाही तर जगायचे कसे असा मूळ प्रश्न उपस्थित करून खामल्यातील राजेंद्र मुळक यांच्या घरासमोर सोमवारी महाराष्ट्र राज्य जाती जमाती कृती समितीच्यावतीने ‘हल्ला बोल’ आंदोलन केले.