दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे नाल्याच्या पात्रात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळलेल्या प्राध्यापकाचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मृत प्राध्यापकाची वनपाल असलेली पत्नी धनश्री देशमुख (२८) व तिचा सहकारी शिवम चंदन बचके (३३) रा. आकोट यांना अटक करण्यात आली. या दोघांनाही आज न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा संशयास्पद मृतदेह दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे आढळला होता. सदर प्राध्यापकाचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले. दरम्यान, गुरुवारी याप्रकरणी प्राध्यापकाची पत्नी व तिच्या वनपाल असलेल्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रा. सचिन वसंतराव देशमुख यांचा मंगळवारी सकाळी पुसद-दिग्रस मार्गावर पुलाखाली संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. प्रा. देशमुख हे शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे वनपाल म्हणून नोकरीस असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

बुधवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रित केले. तसेच खबऱ्यांच्या माध्यमातून प्राध्यापकाबद्दल माहितीही गोळा केली. या प्रकरणाचा तपास सायबर टीम, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून विविध बाजूने सुरू होता. या पथकाने दिग्रस, उमरखेड आणि आकोट येथे लक्ष केंद्रित केले. शवचिकित्सा अहवालातून गळा आवळून खून झाल्याचे पुढे आल्यानंतर तपास चक्रे गतिमान झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस, उमरखेड पोलीस, एलसीबीसह सायबर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकोटमधील परतवाडा येथे जाऊन तपास केला तेव्हा या खुनाचे बिंग फुटले. सचिन देशमुख यांच्या हत्येमागे सचिनची पत्नी व तिचा प्रियकर असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी वनपाल धनश्री देशमुख व वनपाल शिवम बचके यांना अटक केली.

आज शुक्रवारी दोन्ही आरोपींना दिग्रस न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी दिग्रस पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दिग्रस न्यायालयाने आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने यांच्यासह दिग्रस पोलीस करीत आहेत.