अमरावती : जुनी पेन्‍शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्‍यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्‍या संपाच्‍या सातव्‍या दिवशी आज अमरावतीत संपकरी कर्मचाऱ्यांनी जिल्‍हा परिषदेसमोर ‘थाळीनाद’ आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी १० वाजतापासूनच आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेसमोर संपकरी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली. नेहमीप्रमाणे घोषणाबाजी व निदर्शने केल्यानंतर संपकर्त्‍यांनी थाळ्या वाजवून शासनाचा निषेध केला. चालू आठवडा हा ‘लक्षवेध आठवडा’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. आंदोलनात महिला शिक्षकांचा सहभाग लक्षणीय होता. समन्वय समितीचे नेते डी. एस. पवार, पंकज गुल्हाने, नामदेव गडलिंग, भास्कर रिठे, राजेश सावरकर यांच्‍या नेतृत्‍वात हे आंदोलन करण्‍यात आले. आपल्‍या विविध १८ मागण्‍यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. संपामुळे नागरी सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर : शासकीय कार्यक्रमातच ‘जुनी पेन्शन योजना’ हे गीत सादर, चर्चेला उधाण

हेही वाचा – बुलढाणा : पैनगंगा नदीत नाव उलटली, शेतमजूर महिलेचा मृत्यू

जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हाकचेरी, उपविभागीय अधिकारी-तहसील कार्यालये, दवाखाने, शाळा-महाविद्यालये, कृषी विभाग, वन विभाग यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमधील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे कार्यालये ओस पडली आहेत. संपकऱ्यांनी आजपासून लक्षवेध आठवडा पाळण्याचे ठरविले आहे. आज थाळीनाद आंदोलन करण्‍यात आले. यावेळी घोषणाबाजीही करण्‍यात आली. २२ मार्चला गुढीपाडव्यानिमित्त सकाळी ११ वाजता शासनाला सुबुद्धी द्यावी यासाठी ईश्वराकडे सामुदायिक प्रार्थना केली जाईल. तर २३ मार्चला शहीद दिनी सर्व कर्मचारी/शिक्षक काळे झेंडे घेऊन जिल्‍हा परिषदेसमोर काळा दिवस पाळतील. त्यानंतर २४ मार्चला ‘माझे कुटुंब-माझी पेन्शन’ यानुसार जिल्हाभरातील कर्मचारी, शिक्षक कुटुंबासहित जिल्हा परिषदेसमोर निषेध व्यक्त करतील, असे सांगण्‍यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest for old pension scheme in amravati employees on strike persisted in their demand even on the seventh day mma 73 ssb
First published on: 20-03-2023 at 12:52 IST