रस्त्यांसाठी केवळ २६ कोटींची तरतूद

नागपूर :  रस्त्यावरील खड्ड्यांबाबत विद्यमान सदस्यांसह अनेकांच्या तक्रारी असल्याने अर्थसंकल्पात २६ कोटींचे पुनर्नियोजन करण्यात आल्याने आता या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.  परंतु, स्थायी समितीने यासाठी ४१.५० कोटींचा प्रस्ताव दिला होता. मात्र, बुधवारी झालेल्या विशेष सभेत केवळ ३६.५० कोटींच्या पुनर्नियोजन निधीला मंजुरी देण्यात आली. यातील २६ कोटींचा निधी रस्त्यांसाठी तर १० कोटींचा घनकचरा व्यवस्थापनासाठी मंजूर करण्यात आला. 

पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका बघता सत्ताधारी भाजपने निधीची जुळवाजुळव करण्याची कसरत सुरू केली आहे. स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी रस्त्यांच्या कामासाठी ४१.५० कोटींचा अतिरिक्त निधी  मंजूर केला होता.  हा निधी इतर विभागांच्या निधीतून  वळता करण्याचे निश्चित करण्यात आले होते. 

रस्त्यांच्या कामासाठी उपलब्ध निधी पुरेसा नसल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या महासभेत सांगितल्यानंतर, महापौर दयाशंकर तिवारी यांनी निधीचे पुनर्नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी झालेल्या विशेष सभेत यावर चर्चा करून ३६.५० कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली.

यामध्ये आठ कोटी रुपयांचा निधी  रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी, तर ५ कोटी डांबरीकरणासाठी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रस्ते विकास कार्यक्रमासाठी १० कोटी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पुनर्नियोजनाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असली तरी स्थायी समितीने पाठवलेल्या ४१.५० कोटींच्या प्रस्तावाला कात्री लावण्यात

आली आहे. 

नासुप्रचा हॉटमिक्स प्लान्ट वापरणार

रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेच्या हॉटमिक्स प्लान्टबरोबरच नागपूर सुधार प्रन्यासच्या हॉटमिक्स प्लान्टची मदत घेण्यात येणार आहे. आतापर्यंत महापालिकेच्या हॉटमिक्स प्लान्टच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यात येत होती. हिंगणा येथे असलेल्या या प्लान्टमधून प्रतितास ३० टन डांबर तयार करण्याची क्षमता आहे. मात्र, नासुप्रच्या बॅचमिक्स प्लान्टची क्षमता प्रतितास ८० ते १०० टन इतकी आहे. त्यामुळे महापालिका या कामासाठी नासुप्रची मदत घेणार आहे. पावसाळा संपताच या कामांना सुरुवात

होणार आहे.