नाफेडमार्फत हरभरा खरेदी लवकरच पुन्हा सुरू करण्यात येणार असून खरेदीला मुदतवाढ मिळणार आहे. वाढीव उद्दिष्टासह केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून येत्या तीन-चार दिवसांत खरेदी सुरू होईल, अशी माहिती पणन विभागामार्फत देण्यात आली.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांकडून हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. यावर्षी हरभरा पिकाचे उत्पादन चांगले झाले. जिल्ह्यात सुरुवातीला एफ.सी.आय.कडून हरभरा खरेदी करण्यात आली. यंत्रणेकडील साधन सामुग्रीच्या अभावामुळे तसेच नियोजनशून्य व्यवस्थापनामुळे हरभरा खरेदी कमी झाली, तसेच १२ एप्रिलपासून एफसीआयकडून हरभरा खरेदी बंद करण्यात येऊन नाफेड अंतर्गत खरेदी सुरू करण्यात आली. नाफेडकडून सुद्धा खरेदी प्रक्रियेला गती न मिळाल्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळली. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल वेळेत विकता आला नाही. सुमारे ५० टक्के हरभरा उत्पादन विक्रीअभावी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकल्या शिवाय आर्थिक नियोजन करता येणार नाही. नाफेडकडून खरेदी प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विक्री करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडकडून पुन्हा खरेदी सुरू करण्याची मागणीने जोर धरला.
केंद्र शासनाच्या आधरभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडकडून हरभरा खरेदी करण्यात येत होती. हरभरा खरेदीस वाढीव उद्दिष्टासह मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे राज्य शासनामार्फत पाठविण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तीन ते चार दिवसात वाढीव उद्दिष्ट व मुदतवाढ मिळणार आहे. हरभरा खरेदीस मुदतवाढ प्राप्त झाल्यानंतर पुर्ववत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती बुलढाणा जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिली.

खरेदीच्या उद्दिष्टपूर्तीमुळे पोर्टल बंद
केंद्र शासनाने नाफेडला राज्यात ६८ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. हरभरा खरेदीची मुदत २९ मेपर्यंत निश्चित केली होती. मात्र, नाफेडला राज्यात देण्यात आलेले ६८ लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे २३ मे रोजी हरभरा खरेदी पोर्टल बंद झाले आहे. आता ते लवकरच पुन्हा सुरू होईल, असे पणन विभागाकडून सांगण्यात आले.