नागपूर : रुग्णालयातून बहिणीच्या घरी जात असलेल्या एका महिलेला एका युवकाने दुचाकीने घरी सोडून देण्याचा बहाणा केला. रस्त्याने जाताना एका मित्राला फोन करून जंगलात बोलावून घेतले. त्यानंतर दोघांनीही आजारी महिलेवर सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्याची नोंद करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

तिरोड्याची राहणारी ४८ वर्षीय पीडित महिला पतीसोबत राहते. काही दिवसांपासून ती आजारी होती. तिला तिरोडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर तिला रुग्णालयातून सुटी झाली. पती भांडखोर असल्यामुळे ती स्वत:च्या घरी न जाता मध्यप्रदेशात राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी तिरोडा रेल्वेस्थानकावर गेली. ती रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत होती. जवळच एक ४० वर्षीय आरोपी बसला होता. आरोपीने तिची आस्थेने विचारपूस केली. तिरोडा स्थानकाहून कटंगीला गाडी गेल्यावर दुचाकीवर तुला सोडून देतो, अशी त्याने थाप मारली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या दुचाकीवर बसून निघाली. त्यावेळी रात्र झाली होती. काही अंतर गेल्यानंतर त्याने तणसाच्या पेंड्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा…राष्ट्रीय मार्गावरील खोदकामाचे बळी! दुचाकी अपघातात पुत्र ठार, वडील गंभीर जखमी

एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने सहकारी रामूला बोलावून घेतले. दोघांनीही महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीने निघून गेले. पीडिता आजारी होती. त्यातच सामूहिक अत्याचाराने ती भयभीत झाली. तिला काही सुचेनासे झाले होते. काय करावे, कुठे जावे म्हणून ती रस्त्याने पायीच निघाली. तिची अवस्था बघून लोकांनी आस्थेने विचारपूस केल्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचे उघड झाले.

हेही वाचा…नववधू पतीची दारात वाट पहात होती, मात्र घरी आले…

लोकांनीच पोलिसांना माहिती दिली. तिला दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. शनिवारी रात्री १० वाजता तिला गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. चोवीस तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.