नक्षलप्रमुख गणपतीचे प्रथमच शहरी समर्थकांना पत्र
दलितांवर होत असलेल्या अत्याचारावरून विरोधकांनी मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवलेला असतानाच आता नक्षलवाद्यांनी सुद्धा त्यात उडी घेतली असून नक्षल चळवळीचा प्रमुख गणपतीने प्रथमच शहरी भागातील समर्थकांना पत्र लिहून या अत्याचाराविरोधात ‘सनदशीर’ मार्गाने आंदोलन करा, असा सल्ला दिला आहे. हैदराबादमधील रोहित वेमुल्ला प्रकरण गाजत असतानाच्या काळात गणपतीने लिहिलेले हे पत्र आता गुजरातमधील अत्याचाराच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक झाले आहे.
गेल्या फेब्रुवारीपासून देशभर गाजत असलेले रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येचे प्रकरण, त्यानंतर गायीच्या मुद्यावरून गुजरातसह ठिकठिकाणी दलितांवर होत असलेले अत्याचार वाढल्याने विरोधकांनी सध्या भाजप सरकारला धारेवर धरले आहे. नेमक्या याच पाश्र्वभूमीवर आता गणपतीचे हे पत्र समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दंडकारण्याच्या जंगलात दडून बसलेल्या गणपतीने हे पत्र १६ मार्चला लिहिलेले असले तरी ते जुलै अखेरीस समाजमाध्यमांवर उपलब्ध झाले आहे. माओच्या सांस्कृतिक क्रांतीला झालेली ५० वर्षे, देशातील नक्षलबारीच्या उठावाला होत असलेली ५० वर्षे, रशियन क्रांतीला झालेली ५० वर्षे व मार्क्‍सच्या जन्माची द्विशताब्दी, असा वैचारिक हवाला देत गणपतीने प्रथमच शहरी भागातील समर्थकांशी थेट संवाद साधताना देशभरातील सद्यस्थितीचा ऊहापोह केला आहे.
देशात सध्या आदिवासी, दलित व शोषितांवरील अन्यायात कमालीची वाढ झाली आहे. विशेषत: दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी आता शहरी भागातील समर्थकांनी एकजूट दाखवणे आवश्यक झाले आहे. चळवळीची गुरिल्ला आर्मी व जनताना सरकारमध्ये सहभागी असलेल्या स्थानिक समित्या जंगलात राहून या अन्यायाचा विरोध करीत आहेच, पण शहरी भागात सुद्धा याविरुद्ध उठाव होणे गरजेचे आहे. तेव्हा शहरात सक्रिय असलेल्या समर्थकांनी आता कार्यशाळा, परिसंवाद, जाहीरसभा, मोर्चे आयोजित करून या अन्यायाला समाजासमोर न्यावे, असे गणपतीने म्हटले आहे. शहरी समर्थकांनी केवळ कार्यक्रम आयोजनावरच न थांबता या अन्यायाविरुद्ध विविध वृत्तपत्रांमधून लेख लिहावेत, पुस्तके प्रकाशित करावीत व वैचारिक क्रांती निर्माण करण्यात हातभार लावावा, असे आवाहनही गणपतीने केले आहे.
चळवळीतील सहकारी व समर्थकांशी पत्राद्वारे नियमितपणे संवाद साधणाऱ्या गणपतीने यावेळच्या पत्रात प्रथमच शहरी भागातील समर्थकांचा मुद्दाम उल्लेख केला आहे. नागरी भागातील असंतोषाचा फायदा उचलण्यासाठीच नक्षलवाद्यांनी ही खेळी खेळली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आता ‘मित्र संघटना’
हिंसेचा पुरस्कार करणाऱ्या या चळवळीच्या प्रमुखाने या पत्रातून प्रथमच सनदशीर मार्गाने लढा देण्याचा सल्ला आपल्या समर्थकांना दिला आहे. शिवाय, या समर्थकांना, तसेच शहरात सक्रिय असलेल्या संघटनांना प्रथमच ‘मित्र संघटना’ असे संबोधले आहे. या संघटनांवर कारवाई करता यावी, यासाठी सरकार नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याच्या पाश्र्वभूमीवर गणपतीचे हे पत्र जारी झाल्याने पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.