सहा महिने शोध घेऊनही केवळ ५२ ‘प्रकाशाची बेटे’

शासनस्तरावर आदर्श पुरस्कारासाठी शेकडोच्या संख्येने अर्ज येत असताना अमृत महोत्सवात पदार्पण करणाऱ्या राष्ट्र सेवा दलासारख्या सेवाव्रती संस्थेला सहा महिने शोध घेऊनही ३६ जिल्ह्य़ांमध्ये आदर्श शिक्षकांच्या रूपाने केवळ ५२ प्रकाशाची बेटे मिळत असतील हा सर्वासाठीच चिंतनाचा विषय आहे.

केंद्र किंवा राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्यावेळी प्रत्येक जिल्ह्य़ातून २० ते ४० प्रस्ताव येतात. त्यातून एक किंवा दोघांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त होतात. त्यात मंत्र्यांच्या मतदारसंघात येणारे, राजकीय प्रभाव पाडणारे, शिक्षण संस्था असलेले, सरकार दरबारी वजन असलेल्यांना झुकते माप मिळते. मात्र अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण करून ७५ शिक्षकांचा सन्मान करू पाहणाऱ्या राष्ट्र सेवा दलाला ५२ शिक्षकांवरच समाधान मानावे लागले. शाळेव्यतिरिक्त सामाजिक बांधिलकी जपणारे, जात धर्म पंथाच्या पलीकडे विचार करून गाव व समाजाच्या विकासात भर घालणारे, प्रबोधन करणाऱ्या शिक्षक रूपी प्रकाशाच्या बेटांची शोधाशोध संघटनेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता.

साने गुरुजींच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार असल्याने साने गुरुजींना अपेक्षित भातृभाव त्यांना या प्रकाशाच्या बेटांमध्ये अपेक्षित होता. शिवाय संघटनेने प्रस्ताव न मागवता समाजातील मान्यवर मंडळी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सूचना मिळवल्या होत्या. त्यात त्यांना शेकडोने सूचना आल्या मात्र, ३६ जिल्ह्य़ांमध्ये पात्र शिक्षक केवळ ५२ सापडले. शिक्षकांचा सन्मानही स्मृतीचिन्ह, भारताचे संविधान, दीड-दोन हजारांची पुस्तके आणि मानपत्र प्रदान करून आगळावेगळा पद्धतीने केला. मात्र, ७५ शिक्षक मिळू शकले नाहीत, ही खंत कायम राहिली.

सन्मान समारंभाच्या कार्यक्रमाला शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अनिल सद्गोपाल, डॉ. विवेक सावंत, प्रा. शरद जावडेकर, नाना ठाकरे, समाजवादी नेते भाई वैद्य, डॉ. अभय बंग, सिने अभिनेते संदीप कुलकर्णी अशा मान्यवरांचा संबंध होता. शिक्षण क्षेत्राला किंवा सामाजिक कार्याला वाहिलेल्या मंडळींच्या उपस्थितीत शिक्षणातील दुर्दशेसंबंधी खंत व्यक्त करीत असतानाच केवळ ५२ शिक्षक मिळाल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात अधिक सविस्तर बोलताना राष्ट्र सेवा दलाचे कार्यालयीन व्यवस्थापक शिवराज सुर्यवंशी म्हणाले, राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांकडून ही नावे मागवण्यात आली होती. त्यासाठी आम्ही कुठलेही प्रस्ताव मागितले नव्हते. कार्यकर्त्यांकडून आम्हाला सुमारे ३५० सूचना आल्या होत्या.

मात्र, त्यातील केवळ ५२ लोक आम्हाला पात्र वाटले. विदर्भातून तसा कमीच प्रतिसाद मिळाला. संघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने आम्ही तसा निर्णय घेतला होता पण पाहिजे तेवढे शिक्षक आम्हाला मिळू शकले नाहीत.

पुरस्कारांचे मानकरी

अहमदनगर-भाऊसाहेब चासकर, अमरावती-मंगला बिधळे, अकोल- किशोर बळी, औरंगाबाद- विश्वनाथ दाशरथे, बीड-जालींधर पैठणे,  भंडारा- स्मिता गालफडे, बुलढाणा- नरेंद्र लांजेवार, चंद्रपूर-प्रभा चामटकर, धुळे- इक्बाल शाह, हिंगोली- नागेश वाईकर, जळगाव- साधना भालेराव व शरद वासनकर, जालना- अनिल सोनुने, कोल्हापूर- सुचिता पडळकर व सातप्पा कांबळे, विश्वनाथ पाटील, लातुर- मुल्ला रुक्साना मैनोद्दीन, हरिदास तम्मेवार, नांदेड- शिवाजी अंबुलनेकर, अर्चना पारळकर, नंदूरबार- बटेसिंग पावरा, नाशिक- स्वाती वानखेडे, राहुल गवारे, उस्मानाबाद- सुरिता उपासे, डॉ. दीपा सावळे, पुणे- शबाना पठाण, स्वाती राजन, रबाय खान आणि उज्ज्वला सोनी, रायगड- आरती नाईक, रमेश पाटील, रत्नागिरी- मंगेश मोहिते, सांगली- कृष्णात पाटोळे आणि नशिमा मुजावर, सातारा- डॉ. संजय पुजारी, सिंधुदुर्ग- डॉ. राजेंद्र मुंबरकर, सोलापूर- योगेश भांगे, महेश निंबाळकर आणि फारुक काझी, ठाणे- युगेश डोईफोडे, वर्धा- सुषमा शर्मा, यवतमाळ- नरेंद्र भांडारकर, गडचिरोली- मनमोहन चलाख, मुंबई- अनंत पाटील, रुपेश नकाशे आणि भूषण मालवणकर, पालघर- अनिता शनवार, मानसी पाटील, वाशीम- बाळासाहेब गोटे, गोंदिया- नागसेन भालेराव, नागपूर- कीर्ती पालटकर आणि परभणी- उत्तम खोकले.