नागपूर : सात स्वयंसेवकांच्या साथीने नागपुरात सुरू झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सातासमुद्रापलीकडे विस्तारला आहे. यंदा विजयादशमीला संघाला शंभर वर्षे पूर्ण होणार असून ग्रामीण भागातील शाखा विस्ताराचे लक्ष ठेवले आहे.

शताब्दी वर्षात देशभरातून २ हजार ४५३ स्वयंसेवक पूर्णवेळ संघाच्या विस्तारासाठी काम करणार आहेत. ग्रामीण भागाला जोडणे, ग्रामीण शाखा सुरू करणे यावर भर राहणार आहे.

जगातील हिंदू समाजाला एकसंध करणाऱ्या संघाच्या शताब्दी वर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाखा हा संघाचा आत्मा आहे. त्यामुळे शाखा विस्तारावर संघाचा भर राहणार आहे. संघाच्या देशभर लाखो शाखा आहे. मधल्या काळात ग्रामीण भागातही शाखांची संख्या मोठी होती. परंतु, अलीकडे संघ विस्तारत असला तरी ग्रामीण शाखा कमी झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागाला संघासोबत जोडणे, शाखा विस्तार करण्यावर संघाने भर दिला आहे. २ हजार ४५३ स्वयंसेवक विस्ताराचे काम करणार आहेत. २०२५ ते २०२६ असा त्यांचा कार्यकाळ राहील. या शताब्दी वर्षात ते ग्रामीण भागातील संघ विस्तारवर भर देणार आहे.

२ हजार ४५३ स्वयंसेवक पूर्णवेळ सेवेत, घरोघरी संपर्क मोहीम

‘प्रत्येक गाव, प्रत्येक वस्ती, घरोघरी’ या मथळ्याखाली नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन आठवड्यांसाठी घरोघरी एक भव्य संपर्क मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपर्कादरम्यान, संघाचे साहित्य वाटप केले जाणार आहे. तसेच, स्थानिक घटकांकडून कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.