‘नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा..’
दिवाळीत अनेक जण जुने कपडे अनाथाश्रमात पोहोचवतात, पण अनाथाश्रमातील त्या अनाथांना या सगळ्या कपडय़ांची गरज असतेच असे नाही. कित्येकदा गरजेपेक्षा अधिकचा साठा किंवा गरज नसणाऱ्या वस्तूदेखील त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यामुळे या पारंपरिक पद्धतीला फाटा देत येथील तरुणाईच्या रायलो फाऊंडेशनने १ नोव्हेंबरपासून आगळा उपक्रम सुरू केला आहे. जुने कपडे, उबदार कपडे, चप्पल या सगळया वस्तूंची खरी गरज रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना, रिक्षेवाल्यांना, उदरनिर्वाहासाठी दररोज मिळेल ते काम करणाऱ्यांना असते.
त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवण्यासाठी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी सध्या तरी नागपुरातील शनी मंदिर नवीन ब्रिजखाली एक भिंत रंगवली. या भिंतीवर त्यांनी ‘माणुसकीची भिंत’ असे नाव कोरले. ‘नको असेल ते द्या.. हवे असेल ते घेऊन जा..’ असा संदेश रंगवून लहान मुले, महिला, पुरुष असे वेगवेगळे कप्पे करून कपडे अडकवण्यासाठी खिळेही ठोकले. नागरिकांनी त्यांच्याकडील कपडे आणायचे आणि त्या त्या कप्प्यानुसार अडकवण्याची व्यवस्था त्यांनी केली. विशेषत: जुने वापरातील कपडे, ब्लँकेट, स्वेटर्स, उबदार कपडे, लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवून, इस्त्री करून आणण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या माणुसकीच्या भिंतीला रखवालदार नाही, तर प्रत्येक अध्र्या-एक तासाने जमेल तसे ‘रायलो फाऊंडेशन’चा एक सदस्य येऊन या भिंतीवर एक नजर टाकून जातो. येथे जमा झालेल्या वस्तू ज्यांना ज्या गरजेच्या आहेत त्यांनी त्या घेऊन जाव्यात, असा हा उपक्रम आहे.
जुने कपडे किंवा वस्तू विकणाऱ्यांचा धोका असू शकतो, पण त्यावरही त्यांनी पर्याय शोधला आहे. या ठिकाणी एक पेटी ठेवून नागरिकांनी या पेटीत वस्तू टाकायच्या आणि या फाऊंडेशनचा एक सदस्य येऊन दररोज त्यातील आवश्यक तेवढय़ा वस्तू या भिंतीवर अडकवणार, असा हा पर्याय आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. दानदात्यांनी त्यांच्या गरजेचे नसलेले कपडे, वस्तू येथे ठेवले आणि गरजूंनी ते उचलले.
सामाजिक दायित्वाची जबाबदारी
महालमधील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या वर्ष २०००च्या दहावीच्या सुमारे ३० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माणुसकीची ही भिंत उभारण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून ३० मित्रांचा हा समूह स्वत:ची ओळख कुठेही समोर येऊ न देता सामाजिक दायित्वाची जबाबदारी पार पाडतो आहे. याआधीही त्यांनी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम फाऊंडेशन’ला मदत केली. त्यातूनच या नव्या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली. सध्या तरी ही एकच भिंत आहे, पण इथे प्रतिसाद मिळाला तर यशवंत स्टेडियम, साई मंदिर, गणेश टेकडी आदी परिसरातही ‘माणुसकीची भिंत’ उभारली जाणार आहे.