वर्धा : क्रीडा विश्वात नवनवे विक्रम स्थापित होत असतात. मात्र, नृत्यातही विक्रम व तोसुध्दा एका सात वर्षीय चिमुरडीने करण्याची बाब विशेषच म्हणावी. येथील चन्नावार इ स्कूलमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या अर्णवी सागर राचर्लावार हिने सलग ३ तास ३९ मिनिटे भरतनाट्यम सादर करीत हा विक्रम केला आहे. अर्णवीला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने एक तासाचे लक्ष्य दिले होते. पण ते लीलया पार पाडत अर्णवीची पावले थिरकत राहिली. हे पाहून थक्क झालेल्या संस्थेच्या डॉ. मनोज तत्ववादी यांनी विक्रमाची नोंद झाल्याचे जाहीर केले.
तिने आजवर सात वर्षाच्या कालावधीत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण १३७ पुरस्कार पटकावले आहेत. दत्ता मेघे सभागृहात संपन्न या उपक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मेघे संस्थेचे डॉ. उदय मेघे, स्वयेंसेवी डॉ. सचिन पावडे, दिनेश चन्नावार आदी उपस्थित होते. यावेळी अर्णवीचे गुरू सचिन डांबरे यांचा सत्कार करण्यात आला. अर्णवीची आई दिपाली यांना तर हा विक्रम केल्याने अश्रू आवरत नव्हते. त्यांनी सर्वांचे आभार मानले. अर्णवीवर कौतुकाचा अलोट वर्षाव यावेळी झाला.