गोंदिया : रस्ते अपघात कमी व्हावे, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, प्रवास सोईस्कर व्हावा याकरिता चिचगड पोलिसांनी कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून नक्षलग्रस्त भागात स्तुत्य उपक्रम राबविला. धोकादायक वळणावरील झाडे, विद्युत खांबांना दिशादर्शक (रिफ्लेक्टर) लावले. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

हेही वाचा >>> खळबळजनक! देशात जानेवारी व फेब्रुवारीत एकूण ३४ वाघांचा मृत्यू

गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी पोलिसींग सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थी, नागरिकांच्या हिताकरिता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिचगड पोलिसांनी दिशादर्शक लावण्याचा उपक्रम हाती घेतला. दरम्यान, रस्ता अपघाताचे प्रमाण कमी करणे, वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे याकरिता पोलिसांनी गुरुवारी नक्षलग्रस्त भागातील धोकादायक व अतिधोकादायक रस्ते, वळण, रस्त्यालगतची धोकादायक झाडे यांना वेगवेगळ्या प्रकारचे व रंगाचे दिशादर्शक लावले. चिचगड ते पिपरखारी तसेच चिचगड, बोरगाव / बाजार, परसोडी रस्त्यावरील धोकादायक अशा १८५ झाडांना व १२५ विद्युत खांबांना दिशादर्शक बसविण्यात आले आहे.