नागपूर : नक्षलवाद्यांसाठी पैसे गोळा करण्यासह दहशतवाद्यांशी संबंध असलेला केरळच्या रेजाझ सिद्धीक याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत वाढ दिली आहे. त्याला लवकरच एटीएस ताब्यात घेणार आहे.
रेजाझ बी. शीबा सिद्धीक याचे पाकिस्तानातील हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेतील सदस्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने पाकिस्तानातील एजंटशी संपर्क केला होता. त्याने व्हॉट्सअपवर काही महत्वाची माहिती पाकिस्तानी एजंटला पाठविल्याचे समोर आले आहे. तसेच त्याचे संबंध नक्षल प्रणीत कबीर कला मंचमधील काही सदस्यांसोबत आहेत. त्यांच्यासोबत तो पुण्यात आयोजित काही बैठकीत सहभागी झाला होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तसेच त्याचे संबंध जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सदस्यांसोबत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
त्यामुळे आता एटीएस सिद्धीकला ताब्यात घेणार आहे. सिद्धीकच्या केरळमधील एर्नाकुलम येथील घरावर पोलिसांनी छापा टाकला असता दोन पेन ड्राईव्ह, दोन मोबाईल फोन आणि काही संशयास्पद कागदपत्रे मिळाली. तसेच त्याने राज्यघटनेबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले आहे.सिद्धीकचा नक्षलवाद्यांशी संबंध असून त्यांच्यासाठी पैसे जमा करण्यासाठी तो पुढाकार घेत होता. त्याच्या घरात सापडलेल्या पत्रकात काही ‘क्युआर कोड’सुद्धा मिळून आले. त्यामाध्यमातून त्याने बंदी असलेल्या संघटनांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन तो करीत होता. बंदी असलेल्या संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांच्या तो संपर्कात होता, अशी माहिती मिळाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत आक्षेपार्ह पोस्ट इंस्टाग्रावर केल्या होत्या. त्यामुळे सिद्धीकवरील गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे. त्याला गुरुवारी लकडगंज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सिद्धीकला चार दिवसांची (१८ मे) पोलीस कोठडी सुनावली आहे. संवेदनशिल प्रकरण असल्यामुळे लकडगंज पोलीस गोपनीय तपास करीत असून त्याच्या संपर्कात असलेल्यांनाही ताब्यात घेणार आहे.
एनआयए कडूनदेखील होऊ शकते चौकशी
सध्या रेजाझ हा पोलीस कोठडीत आहे. त्याची कारस्थाने समोर आल्याने एनआयएकडून त्याचा तपास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने ऑपरेशन सिंदूरविरोधात चिथावणीखोर इन्स्टाग्राम पोस्ट लिहीली होती. तो सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन चौकात असलेल्या एअरगनच्या दुकानात पोहोचला होता व तिथे दोन बंदुकींसह फोटो काढत तो सोशल माध्यमांवर पोस्ट केला होता. युके-आधारित सिम कार्डद्वारे तो अनेकदा संवाद साधायचा.
विविध माओवादी संघटनांशी संबंध
रेजाझ याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. चौकशीदरम्यान तो केरळमधील ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट युनिट’चा सदस्य असल्याची बाबदेखील समोर आली. भीमा कोरेगाव प्रकरणातील १६ आरोपींपैकी काहींशी त्याचा संपर्क होता. ‘कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्स’ आणि ‘कमिटी अगेन्स्ट स्टेट रेप्रेशन’ या बंदी घातलेल्या संघटनांशीदेखील त्याचा संबंध होता.