नागपूर : गरज नसतानाही महानिर्मितीसाठी कोळसा धुण्याचे काम खासगी कोल ‘वॉशरीज’ला दिले गेले आहे. या ‘वॉशरीज’ला नाकारलेला कोळसा केवळ ४०० रुपये टन या नाममात्र दरात दिला जातो. त्यामुळे महानिर्मितीला ५ वर्षांत २६ हजार कोटींचा फटका बसणार आहे. हा भ्रष्टाचार थांबवल्यास राज्यात वीज दरवाढीची गरज नाही, असा दावा नागपुरातील जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला.
महानिर्मितीने महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाच्या माध्यमातून वर्षांला २२ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा धुण्याचे काम विविध खासगी ‘वॉशरीज’ला दिले आहे. प्रत्यक्षात धुतलेला कोळसा वापरल्यावर वीजनिर्मिती वाढल्याचे कोणतेही प्रमाण नाही. दुसरीकडे महानिर्मितीला चांगला उष्मांक असलेला कोळसा मिळत असताना तो धुण्याची गरज नाही. हा कोळसा धुताना २५ टक्के कोळसा नाकारला जातो. हा नाकारलेला कोळसा महानिर्मितीने खुल्या बाजारात विकणे अपेक्षित असताना तो ‘वॉशरीज’ला नाममात्र ४०० रुपये टन दरात दिला जातो, असे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, ‘वॉशरीज’ हा कोळसा खुल्या बाजारात छुप्या पद्धतीने दहा हजारांहून जास्त रुपये प्रति टन दराने विकून मोठा भ्रष्टाचार करत आहे. त्यामुळे महानिर्मिती ही शासकीय कंपनी पोखरत आहे. या घोटाळय़ाची विविध राज्य व केंद्रीय तपास यंत्रणेकडे तक्रार केली; परंतु काहीच उपयोग झाला नाही. हे प्रकरण गंभीर असल्याने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देतील का, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला.