अकोला : रिपब्लिकन सेनेची भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसोबतची युती फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. आनंदराज आंबेडकरांच्या निर्णय निराशा आणि वेदनादायक आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली. हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळाला का? असा संतप्त सवाल करीत वंचित आघाडीने आनंदराज आंबेडकरांवर टीकेची तोफ डागली.
रिपब्लिकन सेना-शिवसेनेच्या युतीची घोषणा आज एकनाथ शिंदे व आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्यावर वंचित आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त करीत आनंदराज आंबेडकरांच्या भूमिकेवर चौफेर टीका केली आहे. समाज माध्यमांच्या अधिकृत खात्यावरून वंचितने आपली भूमिका जाहीर केली.
आनंदराज आंबेडकर यांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. राज्य सरकारने यावर्षी एससी, एसटीसाठी राखीव ठेवलेले ७४६ कोटी रुपये लाडकी बहीण योजनेकडे वळवले आहेत. एससी, एसटी निधी वळणाच्या विरोधात लढणाऱ्या आंबेडकरी जनतेशी हा विश्वासघात आहे, तर ‘संविधान कधीच खतरे में नव्हतं’ हे त्यांचे वक्तव्य लाखो संविधानवाद्यांच्या पाठीत वार करणारे आहे, असा आरोप वंचित आघाडीने केला.
आनंदराज आंबेडकरांनी सत्तेसाठी भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेशी युती केली? की, आरएसएस-भाजपच्या अजेंड्याला लपवण्यासाठी, त्यांचे हाताचे बाहुले बनून एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, विशेषतः बौद्ध आणि मुस्लिमांविरुद्ध आरएसएसच्या गुन्ह्यांना आणि अजेंड्यांना पाठीशी घालण्यासाठी केली? असे प्रश्न वंचितने उपस्थित केले आहेत.
महायुती सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्या दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना गप्प करण्यासाठी हे एक शस्त्र त्यांनी आणले आहे. या सरकारने फुले दाम्पत्याच्या जीवन आणि संघर्षावर आधारित फुले चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्युला आजारपणामुळे मृत्यू दाखवला. सत्ताधाऱ्यांविरोधात बौद्ध समूह महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढत आहेत. त्यांची मूळ विचारसरणी भारतीय संविधान, भारताच्या सामाजिक आणि धार्मिक रचनेविरुद्ध आणि अल्पसंख्याकांच्या, विशेषतः बौद्ध आणि मुस्लिमांच्या विरुद्ध आहे. वंचित कायम त्यांच्या विरूद्ध लढा देत राहील, अशी भूमिका पक्षाच्यावतीने मांडण्यात आली.
आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला २०१९ व २०२४ मध्ये पाठिंबा दिला होता. आनंदराज आंबेडकरांनी वंचितच्या पाठिंब्यावर अमरावतीतून लोकसभा निवडणूक लढली. हे सौजन्य आता संपले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी आणि आरएसएस-भाजपच्या हातचे बाहुले झालेल्या लोकांच्या विचारांना जागा नाही, असे वंचित आघाडीने स्पष्ट केले.
रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना वंचितचे निमंत्रण
आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत सहभागी होण्याचे जाहीर निमंत्रण देण्यात आले आहे.