महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : भारत सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील नागपूरच्या केंद्रीय एगमार्क प्रयोगशाळेकडून गेल्या साडेतीन वर्षांत २० संशोधने केली. त्यात मावा, विविध धान्यांचे पीठ, कृषीशी संबंधित वस्तूंचा समावेश आहे.  प्रयोगशाळेत कृषी आणि संबंधित वस्तूंच्या भौतिक आणि रासायनिक विश्लेषणासह कृषी उत्पादनातून निर्मित पदार्थावर संशोधन आणि मानकीकरणाचे काम केले जाते. येथे १ जानेवारी २०१९ ते १ एप्रिल २०२२ या काळात २० कृषी वस्तूंचे संशोधन झाले. एका संशोधनात बदामाची (कर्नल) गुणवत्ता आणि घटक निश्चित करण्यात आले. या घटकानुसार काम केल्यास त्याचे सर्वत्र एकसारखे उत्पादन शक्य आहे. सोबत दालचिनीची गुणवत्ता निश्चिती, घोडा हरभराच्या (कुल्थी) गुणवत्ता सूत्रीकरणावरही येथे संशोधन झाले. 

मका, तांदूळ, उर्डी, सिंघरा, राधुनीपगल तांदूळ , पोहा (सपाट तांदूळ), कलोनुनिया तांदूळ, कटारीभोग तांदूळ, कॉफी व सोया पिठाचे सूत्रीकरण येथे करण्यात आले. यासोबतच तुळशीच्या बियांचे तपशील तयार करण्याचा अहवाल, नाचणीच्या पिठाचे सूत्रीकरण, वाळलेल्या अंजीरच्या गुणवत्तेच्या सूत्रीकरणासह इतरही संशोधन येथे झाल्याचे माहितीच्या अधिकारातून, सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले. 

इतर माहिती देण्यास टाळाटाळ

 उपराजधानीतील केंद्रीय एगमार्क प्रयोगशाळेने साडेतीन वर्षांत २० संशोधन केले. परंतु या प्रयोगशाळेत मंजूर पदे किती, यापैकी रिक्त किती, त्यांनी आतापर्यंत कृषी उत्पादनाच्या तपासणीपासून मिळवलेला महसूल, किती नागरिकांना उत्पादनाच्या तपासणीनंतर दर्जा तपासणी प्रमाणपत्र दिले, अशा काही प्रश्नांवर मात्र या कार्यालयाने माहिती दिली नाही. उलट ही माहिती फरिदाबाद येथील मुख्यालयात विचारण्याचा सल्ला दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Researches central egmark laboratory inclusion of agricultural products ysh
First published on: 22-05-2022 at 00:02 IST