अधिवेशन काळात विशिष्ट ठिकाणीच होर्डिग्जची उभारणी
अधिवेशन काळात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या नेत्यांच्या होर्डिग्जमुळे शहराचा चेहरा विद्रुप होत असल्याने या काळात ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी होर्डिग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून त्या संबंधीचे आदेश लवकरच महापालिका प्रशासनाकडून काढण्यात येणार आहेत.
उपराजधानीत होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात राज्याच्या मंत्रिमंडळासह विविध राजकीय पक्षाचे नेते आणि राज्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी नागपुरात येतात. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध भागात अनधिकृत मोठमोठे होर्डिग्ज आणि बॅनर्स लावले जातात. विशेषत: विमानतळ ते विधानभवन परिसरापर्यंत नेत्यांच्या होर्डिग्जचा सुळसुळाट असतो. त्यामुळे शहराचा चेहरा विद्रुप होतो. नियमानुसार होर्डिग्जसाठी महापालिकेची परवानगी गरजेची असली तरी ती घेण्याच्या भानगडीत सत्ताधारी पक्षाचे नेते कधीच पडत नाहीत.
दोन वर्षांपूर्वी या समस्येकडे लक्ष वेधणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने अवैध होर्डिग्ज काढण्यासाठी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांवर जबाबदारी निश्चित केली होती. असे असतानाही राजकीय नेत्यांचे पोस्टर्स आणि होर्डिग्जचा सुळसुळाट कमी झालेला नाही. यावेळी मात्र अधिवेशन काळात होर्डिग्जसाठी जागा ठरवून देण्यात आल्या आहेत. अनधिकृत होर्डिग्ज लावण्यात आले तर ते काढून टाकण्याचे अधिकार महापालिकेला असल्यामुळे यावेळी ती कारवाई करण्यात येणार आहे. शहरात निर्धारित करून दिलेल्या जागेवरच होर्डिग्ज लावण्याचे कंत्राट महापालिकेने काही कंपन्यांना दिले आहेत. त्यांच्यामार्फत ते लावल्या जातील. अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई करण्याचे अधिकार दहा झोनमधील अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत.
अनधिकृत होर्डिग्जवर कारवाई
स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे या संदर्भात म्हणाले, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त शहरात अनधिकृत किंवा परावानगी न घेता होर्डिग्ज लावण्यात आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जाहिराती संदर्भात काही एजन्सीला काम देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी ज्या जागा निवडल्या आहेत, त्या जागेवरच ते लावले जातील. शहर होर्डिग्ज आणि बॅनरमुळे शहर विद्रुप होऊ नये, याची काळजी विविध राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांनी घ्यावी.