अमरावती : तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार नवनवीन फसवणुकीचे प्रकार समोर आणत आहेत. असाच एक गंभीर प्रकार अमरावती शहरात उघडकीस आला आहे.
ज्यात एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला अश्लील संदेश आणि मनी लाँड्रिंगच्या बनावट गुन्ह्यांमध्ये अडकवून तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ नावाच्या या नव्या सायबर गुन्ह्याने सायबर सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
व्हिडिओ कॉलवर पोलिसाचा ‘तोतया’ फसवणूक झालेले व्यक्ती संजय तुकाराम मेश्राम (६०, रा. नवी वस्ती, बडनेरा) हे आहेत. १७ सप्टेंबर रोजी संजय मेश्राम यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून दिली. त्यानंतर त्याने मेश्राम यांना धक्का देणारी माहिती दिली. ‘तुमच्यावर बंगळूरमधील गांधीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेला अश्लील संदेश पाठवल्याबद्दल गुन्हा दाखल आहे,’ असे सांगून त्याने मेश्राम यांना घाबरवून सोडले.
बनावट गुन्ह्यांची मालिका आणि ‘डिजिटल अरेस्ट’
या तोतया पोलीस अधिकाऱ्याने केवळ अश्लील मेसेजचा आरोप करून थांबला नाही, तर त्याने आणखी एक गंभीर आरोप जोडला. ‘तुमच्या बँक खात्यातून एकूण १५५ अवैध व्यवहार झाले आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी तुमच्यावर सीबीआय आणि आरबीआय (भारतीय रिझर्व्ह बँक) यांचीही नजर आहे,’ अशी भीती त्याने घातली.
या बनावट गुन्ह्यांमधून सुटका करण्याचा एकमात्र मार्ग म्हणून, त्याने संजय मेश्राम यांना ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे जाहीर केले. याचा अर्थ असा की, मेश्राम यांनी त्यांच्या घरातच राहावे, कोणत्याही परिस्थितीत बाहेर जाऊ नये आणि पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करावे. तोतयाने त्यांच्यावर सतत नजर ठेवून, त्यांची सर्व बँक खाती गोठवण्याची धमकी दिली.
भयभीत करून उकळले लाखो रुपये
आपल्याविरुद्ध खरोखरच गंभीर गुन्हे दाखल झाल्याचा विश्वास बसल्यामुळे संजय मेश्राम पूर्णपणे भयभीत झाले. यातून वाचण्यासाठी आरोपीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी ऐकली. तोतयाने ‘या प्रकरणी तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि तुमची बँक खाती सुरळीत ठेवण्यासाठी’ पैशांची मागणी केली. आरोपीच्या सूचनांनुसार, संजय मेश्राम यांनी आरटीजीएस आणि आयएमपीएस या प्रणालींद्वारे टप्प्याटप्प्याने आरोपीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये ३१ लाख ५० हजार रुपये जमा केले.
लाखो रुपये दिल्यानंतरही आरोपीची पैशांची मागणी थांबत नव्हती. तेव्हा मेश्राम यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
