अकोला : पश्चिम विदर्भात जून महिन्यामध्ये अतिवृष्टीसह पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये हजारो हेक्टरवरील शेत जमीन खरडून गेली. पिके पाण्याखाली गेली. अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यावर महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला राज्य शासनाने आता मंजुरी दिली असून पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त लाखावर शेतकऱ्यांना ८६.२३ कोटींची मदत वितरीत केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देण्यात येते. जून महिन्यात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम या जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासन निर्णय महसूल व वन विभागाने निर्गमित केला आहे.

जून महिन्यातील अतिवृष्टीमुळे अमरावती विभागात ९७ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे एक लाख सात हजार ४७२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकूण ८६ कोटी २३ लाख ३८ हजार रुपयांच्या निधी वितरण करण्यास शासनाची मंजुरी दिली. यामध्ये सर्वाधिक निधी बुलढाणा जिल्ह्याला देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात दोन हजार २४० शेतकऱ्यांचे एक हजार ३१२ हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले होते. अमरावतीसाठी दोन कोटी ७५ लाख ७९ हजारांचा निधी मंजुर झाला.

अकोला जिल्ह्यातील सहा हजार १३६ शेतकऱ्यांचे तीन हजार ७९० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान भरपाईसाठी चार कोटी पाच लाख ९० हजार रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील १८६ शेतकऱ्यांच्या १३० हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी दोन कोटी पाच लाख ४५ हजार, बुलढाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या ८७ हजार ३९० हेक्टरवरील नुकसान भरपाईसाठी ७४ कोटी ४५ लाख तीन हजार आणि वाशीम जिल्ह्यातील पाच हजार १६२ हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानापोटी चार कोटी ७१ लाख २१ हजार रुपयांचे आठ हजार ५२७ शेतकऱ्यांना वितरण केले जाईल. या मदतीमुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत होणार असल्याचे चित्र आहे.