‘उपाय’चे विधायक कार्य; बालकदिन विशेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुटपाथवर जीवन जगणाऱ्या, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘उपाय’ नावाची संस्था गेल्या नऊ वर्षांपासून काम करीत आहे. शहरातील विविध भागातील फुटपाथवर अनेक कुटुंब उघडय़ावर आयुष्य जगताना त्यांच्यासोबत त्यांची मुले राहत असतात. या बालकांच्या उघडय़ावर पडलेल्या आयुष्याला शिक्षणाचे संस्कार देत रोषणाई देण्याचे काम ‘उपाय’च्या वतीने सुरू आहे.

मौदा येथील एनटीपीसीजवळील आजूबाजूच्या गावात राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्टय़ा कमजोर असलेल्या कुटुंबातील मुलांना त्या भागात शिक्षणाची कुठलीच सोय नाही. तेथील मुले रस्त्यावर दिवसभर फिरत जीवन जगत होती. खडकपूर येथून आयआयटी करून एनटीपीसीमध्ये कामाला असलेल्या वरुण श्रीवास्तव यांनी त्या भागातील रस्त्यावरील भटकणाऱ्या मुलांची दशा बघितली आणि त्यांनी त्या भागात १५ मुलांना सोबत घेऊ न त्यांना शिक्षण देणे सुरू केले. केवळ शिक्षण नाही त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे, या दृष्टीने त्यांनी स्वत:जवळचा पैसा खर्च करीत मुलांना वेगवेगळ्या शैक्षणिक वस्तूचे वाटप सुरू केले.

कालांतराने  या उपक्रमाशी अनेक युवा शिक्षित जोडले गेले आणि त्यातून युवकांची मोठी चमू तयार झाली. त्यांनी २०११ मध्ये नागपुरातील फुटपाथवर जीवन जगणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आईवडिलांच्या भेटी घेतल्या आणि ज्या ठिकाणी ते राहतात, त्याच ठिकाणी शाळा सुरू केली. आज शहरातील विविध भागातील फुटपाथवर या मुलांच्या शाळा भरवल्या जात आहेत.

खरे तर फुटपाथवरील मुलांचे शिक्षणदाता बनण्याचे आव्हान ‘उपाय’ या सामाजिक संस्थेने स्वीकारल्यानंतर कोणाची मदत घेतली नाही. या संकल्पनेला समाजातील संवेदनशील लोकांच्या मदतीची गरज असल्यामुळे अनेक लोक जुडत गेले. शहरातील सिग्नलवर भीक मागणारी जी मुले असतात, त्यांना ती सवय लागू नये, यासाठी त्यांच्या पालकांचेसुद्धा मार्गदर्शन ‘उपाय’ची चमू करीत असते. त्याचा परिणाम म्हणून शंभरपेक्षा अधिक भीक मागणारी मुले शाळेत येऊ लागली आहेत. महाराजबागजवळील फुटपाथवर नितू मिश्रा यांच्या मार्गदर्शनात किरण कलंत्री, सायली उपगडे, बबिता, योगिता चिमुकल्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritual of teaching life to the open akp
First published on: 14-11-2019 at 00:44 IST