या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • वाठोडा चौक ते संघर्षनगर रस्ता
  • ताप सिमेंट रस्त्यांचा

दरवर्षी डांबरी रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांतून मुक्ती मिळेल म्हणून सिमेंट रस्त्यांच्या कामांकडे आशेने पाहणाऱ्या नागरिकांना या रस्त्यांच्या बांधकामाला होणाऱ्या विलंबामुळे डोक्यावर हात ठेवण्याची वेळ आली आहे. वाठोडा चौक ते संघर्षनगर रस्त्याच्या बांधकामादरम्यान पर्यायी रस्ता निकृष्ट आहे आणि तेथे सुरक्षा रक्षकही नसल्याने कमालीची गैरसोय होत आहे. संथगतीने होत असलेल्या कामामुळे नागपूरकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

वाठोडा चौक ते संघर्षनगर येथे सिमेंट रस्त्याचे काम जवळपास दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. या काळात भांडेवाडी जलकुंभ ते श्रावणनगर या मार्गावरील डाव्या बाजूचा २०० मीटरचा रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. येथून नेहमी जड वाहनांची वाहतूक सुरूअसते. शिवाय िरगरोड पासून संघर्षनगर माग्रे बीडगावसाठी हा मार्ग सोयीचा आहे. मात्र सध्याच्या अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या जिजामातानगर, पवनशक्तीनगर, श्रावणनगर या भागात राहणाऱ्या नागरिकांना मुख्यमार्ग का खोदला हे कळायला मार्ग नाही. कंत्राटदारांना घालून दिलेल्या अटी व शर्तीप्रमाणे जेथे काम सुरूआहे तेथे माहिती फलक लावणे बंधनकारक आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सुरक्षा रक्षक तैनात करावा लागतो. याचे पालन झालेले नाही. कचरा वाहून नेणारे ट्रक आणि जलकुंभावर पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या टँकर्समुळे रस्तावर वाढलेल्या वर्दळीत खोदकामाची भर पडली. खोदकामातून निघालेली माती रस्त्याशेजारी पडून आहे.

रामेश्वरी चौक ते आंबेडकर चौक या दरम्यान सिमेंट रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. या कामाचे कंत्राट आरपीएस इन्फ्रा या कंपनीला मिळाले असून १ ते ३० एप्रिल २०१७ दरम्यान कार्यकाळात पूर्ण करायचे होते. अध्याप एकाच बाजूचे काम देखील पूर्ण झालेले नाही.

येथेही कामाची माहिती देणारा फलक नाही. डाव्या बाजूचे काम पूर्ण झाले मात्र, रस्त्यावरून अध्याप वाहतूक सुरू न झाल्याने तेथे विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. दुसऱ्या बाजूच्या सिमेंट रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्याखालून जलवाहिनी जात असल्याने त्याचा निर्णय अध्याप थंडबस्त्यात आहे. तयार सिमेंटच्या रस्त्याच्या शेजारी रस्ते दुभाजक दगड लावण्यात आले नाहीत. कामांमुळे व्यावसायिकांना फटका बसला.

[jwplayer KrLDSqeZ-1o30kmL6]

पर्यायी मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच झाले आहेत, असे रामेश्वरीतील रहिवासी मुकेश खडतकर यांनी सांगितले. अजनी परिसरातील अजनी रेल्वे उड्डाणपूल ते अजनी चौक या मार्गाचे कंत्राट मुंबईच्या युनिटी इन्फ्राला १४ मार्च ते १३ एप्रिल २०१७ या कार्यकाळात पूर्ण करायचे होते. येथेही सुरक्षा रक्षक नाही. रस्ता तयार करण्याचा कार्यकाळ संपत आला असून अजूनही एका बाजूचा रस्ता न झाल्याने नागरिकांना त्याचा मन:स्ताप सहन करावा लागतो.

तिरंगा चौक ते सक्करदरा या मार्गाच्या दोन्ही बाजूचे काम युनिटी इन्फ्राकडे होते. १७ नोव्हेंबरला एका बाजूच्या सिमेंट रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली अन् २० जानेवारीला रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ३ फेब्रुवारीला दुसऱ्या बाजूचे काम सुरू करण्यात आले असून १० मार्चला काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे ५०० मीटरचा हा सिमेंट रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. केवळ तीन महिन्यात या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले.

संघर्षनगरातील रस्ता का खोदला?

संघर्षनगर येथील रस्त्याची एक बाजू कशासाठी खोदली, याची कल्पना कोणालाही नाही. येथे कोणताच फलक देखील लावण्यात आला नाही. मागील दोन महिन्यांपासून हा मार्ग केवळ खोदून पडला आहे. त्यामध्ये जलकुंभामाग्रे येणारे पाणी खड्डय़ात साचल्याने या भागातील लहान मुलांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. बॅरिकेट देखील लावण्यात आले नसून एकही सुरक्षा रक्षक येथे तैनात नाही. कासवगतीने या मार्गाचे खोदकाम सुरू असून रस्त्याशेजारी माती पडल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

रोशन सहारे, चांदमारी

अजनीचे काम वेळेत पूर्ण होईल

अजनी रेल्वे उड्डाणपूल ते अजनी अशा १ कि.मी.च्या रस्त्याची ‘के-व्हॅल्यू’ चाचणी करायची होती. त्यातून जमिनीची क्षमता कळते. याचा अहवाल येण्यास विलंब झाला. तसेच अहवालानुसार खोदकाम करून जमिनीचे सपाटीकरण करावे लागले. त्यानंतर १२ फेब्रुवारीला सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. अजनी उड्डाणपूल ते चुनाभट्टीकडे जाणाऱ्या छोटय़ा रस्त्यांपर्यंत एका बाजूचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. जानेवारी २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत असून तोपर्यंत काम पूर्ण होईल.

हेमंत देव, कंत्राटदार

[jwplayer 2hVNZXIE-1o30kmL6]

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road issue in nagpur
First published on: 13-04-2017 at 01:07 IST