चार वर्षे विकास कामांकडे दुर्लक्ष
गेल्या साडेचार वर्षांपासून महापालिकेत भाजपची सत्ता असताना सदस्यांनी प्रभागाच्या विकास कामांकडे दुर्लक्ष केले. आता महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागताच शहरातील विविध भागातील प्रभागात रस्त्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.
रस्ते, पाणी, पथदिवे, स्वच्छता ही महापालिकेची प्रमुख कामे आहेत. नगरसेवकांच्या माध्यमातून ती करणे अपेक्षित आहे. निवडणुकांमध्ये याच कामांचा लेखाजोखा मतदारांकडून तपासला जातो. पहिल्या चार वर्षांत झालेली कामे जनतेच्या विस्मरणात जात असल्याने शेवटच्या एक वर्षांत एकाच वेळी अनेक कामे सुरू केली तर नगरसेवक कार्यक्षम आहे, अशी धारणा झाली आहे. त्यामुळेच सुरुवातीला काही तरी थातूरमाथूर कामे करून नंतर शेवटच्या टप्प्यात नगरसेवक कामे हाती घेतात. त्याचा प्रत्यय शहरातील प्रत्येक वॉर्डात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांवरून येतो. ही कामे सुरू करताना लोकांची सोय-गैरसोय लक्षात घेतली जात नाही. रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदार संपूर्ण रस्ता खोदून त्यावरील वाहतूक इतर मार्गाने वळवितो, त्याचा फटका त्या भागातील नागरिकांना बसतो. खोदकामांमुळे जलवाहिन्या, मलवाहिन्या फुटणे, टेलिफोन्सच्या केबलला धक्का बसणे हे, पथदिवे बंद पडणे यासह इतरही अनेक समस्या निर्माण होतात. सध्या हे शहरातील सर्वच भागातील प्रातिनिधीक चित्र आहे. डांबकीरणाच्या कामांमुळे प्रमुख रस्ते बंद आहेत, प्रतापनगर, मानेवाडा, क्वेटा कॉलनी, वर्धमाननगर, संत्रा मार्केट, गोकुळपेठ, धरमपेठ, त्रिमूर्तीनगर, मेडिकल या भागात रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
प्रतापनगर परिसरात सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे तेथील एक मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. घाट रोड परिसरात गेल्या सात महिन्यांपासून पुलाचे काम सुरू असून तो मार्ग बंद करण्यात आला आहे. हुडकेश्वर भागात सुभेदार ले आऊट ते रिंग रोडपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तो मार्ग गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत त्या भागातील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या निदर्शनास ती बाब आणून देण्यात आल्यानंतर त्या रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
२०१२ मध्ये निवडणुका झाल्यानंतर सर्वच नगरसेवकांनी प्रभागाच्या विकास कामांकडे लक्ष देऊन कामे करण्याची अपेक्षा असताना आता केवळ मतदारांना खुश करण्यासाठी प्रभागातील विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहे. ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सच्या वतीने शहरातील विविध भागात पाण्याची वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी खड्डे खोदले जात आहेत. सिव्हील लाईन भागात गेल्या तीन महिन्यांपासून सिमेंट रोडचे काम सुरू आहे. विद्यापीठ ग्रंथालय ते रामदासपेठ या मार्गावर रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. सायंकाळी कार्यालयातून निघाल्यावर रोजच्या मार्गाने जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक मार्गांवरून वळसा घेऊन दुसऱ्या मार्गाने जावे लागत आहे. नंदनवन, रेशीमबाग, सक्करदरा या भागातही रस्त्यांची कामे सुरू आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी कामे सुरू केल्यामुळे विरोधकांनी या संदर्भात टीका करणे सुरू केले आहे. गेले चार वर्षे प्रभागातील विकास कामांकडे दुर्लक्ष करणारे सदस्य आता वस्तीतील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याच्या कामाला लागल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.