नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा विजयादशमी सोहळा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या शताब्दी वर्षात संघाने पंच परिवर्तनावर भर दिला आहे. यात सामाजिक समरसतेचा अंतर्भाव आहे. संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस उपाख्य बाळासाहेब देवरस यांनीही त्यांच्या कार्यकाळात रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांना १९८१ मध्ये संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते.

संघात विजयादशमी उत्सवाला महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी नागपुरातील रेशीमबागेत सरसंघचालक काय बोलतात याकडे जगाचे लक्ष असते. या क्रमात संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘स्व’बोध, पर्यावरण, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन यांचा समावेश आहे. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी दिलेल्या सामाजिक समरसतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर राहणार आहे.

यासाठी खंडस्तरावर सामाजिक सद्भाव बैठका होणार आहेत. संघ काही विशिष्ट जातींपुरता मर्यादित असल्याची टीका वारंवार होत असते. त्याला प्रत्युत्तर म्हणून संघ सर्वसमावेशक तसेच सामाजिक समरसता मानणारा असल्याचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात येत आहे. याआधी सामाजिक समरसतेची सुरुवात करताना बाळासाहेब देवरस यांनी रा. सू. गवई यांना संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते.

स्वयंसेवकांना मार्गदर्शन

संघशिक्षा वर्गाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना रा. सू. गवई यांनी स्वयंसेवकांनाही मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे उदाहरण दिले होते. तसेच जातीप्रथा आणि धार्मिक वादावर टीका करत सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगितले होते. यावेळी व्यासपीठावर भय्याजी सहस्त्रबुद्धे, तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि बाबासाहेब घटाटे उपस्थित होते.