सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

आरक्षणाच्या बाबतीत काही समाज दुर्लक्षित आहेत, ज्या समाजाची शक्ती मोठी त्यांना आरक्षण देण्यात आले आणि ज्यांची शक्ती कमी आहे ते आरक्षणापासून वंचित आहेत. सामाजिक भेदभाव सहन करावा लागत असलेल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे, यात मातंग समाजाचा समावेश आहे. या समाजाला संघटित होण्यासाठी संघ पाठीशी आहे, असा विश्वास  सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला.

साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टतर्फे आयोजित चिंतन शिबिरात भागवत बोलत होते. मातंग समाज हिंदू समाजामध्ये असून दुर्लक्षित आहे. उपेक्षा सहन करीत तुम्ही आतापर्यंत जगत आले, पण धीर सोडू नका. निराश न होता समाजाच्या विकासासाठी संघटित व्हा, हिंदू समाज बदलत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संपूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे.  जे आपल्यापासून दूर गेले आहे त्यांनी परत यावे, यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला डॉ. भागवत यांनी दिला. पाणी, देऊळ आणि स्मशान सर्व हिंदूंना समान व्हावे यासाठी संघ प्रयत्न करीत आहे. याला थोडा वेळ द्यावा लागेल असे भागवत यांनी सांगितले.