जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंद
नागपूरचे पौराणिक महत्त्व, ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीत रेशीमबागेतील संघ मुख्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर याची नोंदही करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर त्या त्या जिल्ह्य़ाची ओळख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थळांची माहिती दिली जाते, त्यात जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्थळे, प्रशासकीय व्यवस्थापन आणि इतरही बाबींचा समावेश असतो. महसूल शाखेने दिलेल्या माहितीच्या आधारे हे संकेतस्थळ एन.आय.सी. (नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर) मार्फत ‘अपडेट’ केले जाते. जिल्ह्य़ाच्या ऐतिहासिक स्थळांच्या यादीत नागपूरच्या संघ मुख्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. ऐतिहासिक स्थळांमध्ये प्रामुख्याने ज्या स्थळांना पौराणिक महत्त्व आहे, ऐतिहासिक वारसा आहे किंवा स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित आहे अशा वास्तूंचा समावेश असतो. त्यात संघ मुख्यालयाच्या समावेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या यादीत ‘रामटेक’चे प्रसिद्ध कालिदास स्मारक, कस्तुरचंद पार्कवरील ऐतिहासिक वास्तू, सीताबर्डीचा किल्ला, नगरधन किल्ला (तालुका-रामटेक), देशातील मध्यवर्ती ठिकाण झिरोमाइल्स आदींचा समावेश असून या प्रत्येक स्थळाला त्यांचा स्वत:चा इतिहास आहे, हे येथे उल्लेखनीय.
विशेष म्हणजे, या संकेतस्थळावर संघ मुख्यालयाबाबत देण्यात आलेली माहितीही ‘अजब’ आहे. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा उल्लेख यात के.बी. हेडगेवार, असा करण्यात आला असून ते ‘क्रांतिकारक’ होते, ब्रिटिश-इंडियात संघ एक सामाजिक व सांस्कृतिक गट होता. संघाचे स्वयंसेवक विविध राजकीय व सामाजिक कामकाजात सहभागी होतात, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांचा बचावकार्यात सहभाग असतो, असे नमूद करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर संघ विचाराचा प्रचार आणि प्रसार सरकारी माध्यमातून करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात असताना त्याला बळ देणारीच ही बाब असल्याचे स्पष्ट होते.
संकेतस्थळ ‘अपडेट’ करण्याची जबाबदारी असणारे एनआयसीचे जिल्हाप्रमुख डी. केसकर या संदर्भात म्हणाले की, महसूल शाखेकडून आलेली माहिती आम्ही संकेतस्थळावर टाकतो. त्या माहितीच्या तपशिलाबाबत आम्हाला अधिक माहिती नसते. कारण, आमचे काम तांत्रिक आहे. या संदर्भात महसूलचे उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.
मग टिकेकर भवन, देवडिया भवन का नाही?
जिल्ह्य़ातील ऐतिहासिक स्थळांच्या यादीत जर संघ मुख्यालयांचा समावेश होत असेल तर ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेले धंतोलीतील टिकेकर भवन, काँग्रेसचे मुख्यालय असलेले देवडिया भवन, काँग्रेस अधिवेशन झालेले स्थळ, यांचाही या यादीत समावेश करायला हवा. कारण, संघस्थापनेपूर्वी म्हणजे, १९२० मध्ये टिकेकर यांच्याकडे महात्मा गांधी आणि खान अब्दुल गफार खान आले होते. नागपूरमध्ये स्वातंत्रपूर्व काळात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते, तसेच देवडिया भवन हे काँग्रेसचे कार्यालय होते. या सर्व स्थळांना ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे.
–लीलाताई चितळे, ज्येष्ठ समाजवादी