असहिष्णुता आणि वंदे मातरमचा घोष या मुद्यांवरून पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देण्यासंदर्भातील विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी दिलेल्या वक्तव्यांमध्ये सुधारणा करून भारतात राहून भारत झिंदाबादचा घोष करणे आवडत नसेल तर त्यांनी खुशाल देश सोडावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेशकुमार यांनी केले.
रा.स्व. संघाची युवकांची संघटना ‘युवा आयाम’च्या वतीने संघ मुख्यालय परिसरातील महर्षी व्यास सभागृहात अखंड भारत स्मृती दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शहरातील स्वयंसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रारंभी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्त्यांचा व महिलांचा जोश बघण्यासारखा होता. सभागृहात तिरंगा घेऊन युवक, महिला नाचत होते. संघ वर्षभर सहा उत्सव साजरे करते. मुख्यालयाच्या परिसरात अखंड भारत स्मृतिदिन पहिल्यांदा आयोजित करण्यात आला होता. त्यातील नाच आणि गाणे बघून खरोखरच ‘बदल’ होत असल्याची प्रचिती आली.
ज्यांना कुणाला भारत जिंदाबाद म्हणणे आवडत नसेल, तर त्यांनी भारत सोडायला हवा. त्यांनी त्यांच्या मुलाबाळांसह त्यांना आवडलेल्या देशात जावे. बेईमान लोकांना भारतात जागा नाही, असेही ते म्हणाले. अखंड भारताची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले, महाभारत या ग्रंथात वर्णन केलेला भारत अखंड भारत आहे. त्याचे अनेक विभाजन झाले. इंग्रजांनी भारताचे विभाजन करून स्वातंत्र्य दिले. यातून पाकिस्तानचा जन्म झाला. त्यांची जन्मकुंडली आपल्याला माहिती आहे, असेही ते म्हणाले.
संघाकडून मोदींची पाठराखण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या मुद्यांवर केलेल्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडीया यांना मोदींना लक्ष्य केले आहे. मोदी हिंदूविरोधी आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न तोगडीया करत असताना इंद्रेशकुमार यांनी मोदी सरकारचे भक्कमपणे समर्थन केले. गेल्या दोन वर्षांत भारत बदलत आहे. जगभर भारत माता की जय, असे घोष दिले जात आहेत. दोन वर्षांत एकही घोटाळा, एकही मोठी राजकीय हत्या झालेली नाही. जगाने योग स्वीकारला, विदेश पाहुण्यांना ताजमहलऐवजी गीता हे धर्मग्रंथ भेट दिले जात आहेत. जातीधर्मावर नव्हे, तर सबका साथ सबका विकास यावर आधारित धोरण आखले जात आहे, असेही ते म्हणाले.