साहिल सय्यदचा पुन्हा एक प्रताप उघड

नागपूर : अनेकांना फसवणाऱ्या साहिल सय्यदने एका विवाहित महिलेला स्वत:च्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची सदनिका बळकावल्याचा प्रकार समोर आला आहे. यात साहिलची दुसरी पत्नी नीलिमा जयस्वालही सोबत होती, हे विशेष. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित ३५ वर्षीय महिला बेसा पावर हाऊस मागे शीला अपार्टमेंटमध्ये राहात होती. तिची २०१३ मध्ये साहिलशी ओळख झाली. साहिलने अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली. तिला मोठमोठी स्वप्ने दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले.  साहिलची तिच्या सदनिकेवर नजर होती. तिला लग्नापूर्वी सदनिका स्वत:च्या नावावर करून देण्यास सांगितले.

तिने नकार दिला असता तिची बदनामी करण्याची धमकी दिली. तिला मारहाणही केली. ऑगस्ट २०१९ मध्ये साहिल, नीलिमा जयस्वाल, भाऊ तौफीक सय्यद, आणि जुबेर हे रियाच्या घरी गेले. तिच्याशी बळजबरी केली. मारहाण केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली. कोऱ्या मुद्रांक शुल्कावर स्वाक्षरी करून घेतली. सदनिकेचे दस्तावेज हिसकावून घेतले. अशाप्रकारे रियाची फसवणूक करीत तिची सदनिका बळकावली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी साहिलसह चौघांवर गुन्हे दाखल केला आहे.