नागपूर : पुण्यातील ‘पोर्श’ घटनेनंतर पुन्हा झोतात आलेल्या नागपूरच्या रामझुलावरील ‘मर्सि़डिज’ अपघातप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल शुक्रवारी आला. फेब्रुवारी महिन्यात दारुच्या नशेत भरधाव मर्सिडिजने दोन लोकांचा बळी घेतला होता. याप्रकरणी आरोपी रितिका उर्फ रितू मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. भोसले पाटील यांनी फेटाळला.२४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर रामझुला पुलावर रितिका मालूने भरधाव वेगात गाडी नेत मोहमद हुसेन गुलाम मुस्तफा आणि मोहमद आतिफ मोहमंद जिया यांना चिरडले होते. अपघातानंतर रितिका आणि तिची मैत्रिण माधुरी शिशिर सारडा या दोघी घटनास्थळावरून फरार होत्या. काही दिवसाने दोघींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत अपघात झाल्याची कबुली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी तहसील पोलिसांनी भादंविच्या कलम २९७, ३३८, आणि ३०४ (अ) अंतर्गत जामीनपात्र गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >>> धक्कादायक! महिला तहसीलदाराने फेरफारसाठी मागितली लाच; लाचलुचपत विभागाने….
पोलिसांनी रितिकाला न्यायालयात हजर केले असता तिला जामीन मिळाला. यानंतर ती मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे निष्पण्ण झाल्यावर भादंविचे कलम ३०४ या अजामीनपत्र कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रितिकाला ताब्यात घेण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला. पोलिसांनी पुरावे म्हणून रितिकाच्या रक्ताचे नमूने, तिच्या पार्टीचे सीपी क्लबचे बिल,सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले. पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्ष्यच्या आधारावर शुक्रवारी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
तीन महिन्यानंतर निकाल
पोलिसांच्यावतीने १२ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला गेला. १३ मार्च रोजी न्यायालयाने आरोपीला अंतरिम जामीन दिला होता. याप्रकरणी यानंतर सुमारे २५ वेळा सुनावणी झाली. २२ मे रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद न्यायालयात पूर्ण झाला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर शेवटी शुक्रवारी न्यायालयाने आरोपीच्या जामीनावर निर्णय दिला. पुण्यातील घटनेनंतर वाढत्या दबावामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना कठोर शिक्षा मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.शुक्रवारच्या अंकात ‘लोकसत्ता’ने ‘पुण्यात जलद न्याय, नागपुरात प्रतीक्षाच’ या मथळ्याखाली याकडे लक्ष वेधले होते.
हेही वाचा >>> शेकापचे नेते राहुल देशमुख यांना नागपुरात अटक; कार्यकर्ते रस्त्यावर…
आदेशाची प्रत मिळताच अटक
सत्र न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप तहसील पोलिसांना प्राप्त झाली नाही. निकालाची प्रत प्राप्त होताच आरोपीला अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसील पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. पुण्यातील अपघात प्रकरणामुळे समाजमाध्यमांवर रामझुलाच्या मर्सिडिज प्रकरणाबाबत चर्चा जोरात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन तातडीने कारवाई करण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे.