अमरावती : शहरात ‘ब्रॅण्डेड’ कंपन्‍यांच्या नावावर बनावट घड्याळी विक्री करण्याचा प्रकार खोलापुरी गेट पोलीस व संबंधित कंपनीच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत उघडकीस आला. जवाहर गेट परिसरातील शनि मंदिराजवळ असलेल्या डायमंड वॉच या प्रतिष्ठानावर छापा टाकून पथकाने ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी प्रतिष्ठानाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एजाज खान हिदायत खान (३४) रा. गुलीस्तानगर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एजाज खान हा आपल्या प्रतिष्ठानातून बनावट घड्याळी तथा चष्मे हे ‘फास्टट्रॅक’ कंपनीचे आहेत, अशी बतावणी करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारावर ‘फास्टट्रॅक’ कंपनीच्या एका पथकाने खोलापुरी गेट पोलिसांच्या मदतीने डायमंड वॉच या प्रतिष्ठानावर छापा टाकला. त्यावेळी एजाज खान हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता ब्रॅण्डेड कंपनीच्या नावावर हुबेहुब तशाच दिसणाऱ्या घड्याळी व चष्मे विक्रीकरिता बाळगत असताना मिळून आला. त्याच्या प्रतिष्ठानातून ६ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ‘फास्टट्रॅक’ कंपनीच्या ६४० बनावटी घड्याळी, २७ हजार रुपये किमतीचे २७० डायल व ४ हजार ९०० रुपये किमतीचे ७ चष्मे असा एकूण ६ लाख ७१ हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा – नागपूर : महाविद्यालय, शासकीय कार्यालयात ‘हेल्मेट सक्ती’; विना हेल्मेट येणाऱ्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी गौरव श्यामनारायण तिवारी (३६) रा. नवी दिल्ली यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आरोपी एजाज खानविरुद्ध कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.