वादग्रस्त निर्णयांबाबत भाष्य करणे टाळले 

नागपूर : शासकीय नोकरीत असताना भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप झालेले आणि साहित्य क्षेत्रातील प्रवासातही कायम वादग्रस्त राहिलेले कादंबरीकार विश्वास पाटील यांची नाशिक येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड झाल्याचे कळूनही अनेक माजी संमेलनाध्यक्षांनी याबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे. एरवी आपल्या प्रदीर्घ अध्यक्षीय भाषणातून नैतिकतेचे ‘ज्ञानामृत’ पाजणारी ही मंडळी अशा वादग्रस्त निर्णयांबाबत अवाक्षरही काढत नसल्याबद्दल संतापमिश्रित आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी शनिवारी संमेलनाचे उद्घाटक म्हणून विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर साहित्य क्षेत्रातून त्यांच्या निवडीवर नकारात्मक प्रतिक्रिया उमटायला लागल्या. या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर माजी संमेलनाध्यक्षांची भूमिका काय, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने माजी संमेलनाध्यक्ष असलेले लक्ष्मीकांत देशमुख, उत्तम कांबळे, डॉ. वसंत आबाजी डहाके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कुठलीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही. अरुणा ढेरे यांनी दूरध्वनी न स्वीकारल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही. अनेक प्रस्थापित-नवोदित साहित्यिक आणि राज्यभरातील अनेक चोखंदळ वाचकही विश्वास पाटलांच्या या निवडीला अयोग्य ठरवत असताना व तशी प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त करीत असताना माजी संमेलनाध्यक्ष यावर उघडपणे बोलण्याचे धाडस का करीत नसावेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

स्वच्छ प्रतिमेचे साहित्यिक संपलेत का?..

आजही अनेक सारस्वत आपली स्वच्छ प्रतिमा जपत मायमराठीचे परीघ विस्तारत आहेत. ज्यांचे कर्तृत्व आभाळाएवढे मोठे आणि साहित्य क्षेत्रातील प्रवास निष्कलंक आहे, अशा लोकांची नावे महामंडळ वा आयोजकांना माहीतच नाहीत की त्यांच्या लेखी स्वच्छ प्रतिमेचे साहित्यिकच आता संपले आहेत, असा संतप्त सवालही साहित्य वर्तुळात विचारला जात आहे.

साहित्य महामंडळही गप्प

या संमेलनाचे आयोजन करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही या विषयावर मौन बाळगले आहे. विशेष म्हणजे, रोखठोक भूमिकेसाठी आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटीलही याबाबत गप्प आहेत. विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असताना ठाले पाटील यांना विश्वासात घेण्यात आले होते का, विश्वासात घेतले असेल तर ठाले पाटील हे विश्वास पाटलांच्या ‘कारकीर्दी’बाबत अनभिज्ञ आहेत का, की त्यांनी ‘बलदंड’ स्वागताध्यक्षांच्या निर्णयाविरोधात न जाण्याची सोयीची भूमिका घेतली आहे, असेही प्रश्न साहित्य क्षेत्रातून उपस्थित केले जात आहेत.

विश्वास पाटलांच्या रूपात परंपरावादी, पुरातनवादी आणि इतिहासाचे विरोधीकरण करणाऱ्याची उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड सर्वार्थाने अयोग्य आहे. प्रस्थापितांच्या या संमेलनात नैतिकतेच्या नुसत्याच गप्पा हाणल्या जातात. त्यावर कृती मात्र शून्य असते. विश्वास पाटलांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय हे त्याचेच उदाहरण आहे.

डॉ. आनंद पाटील, नियोजित अध्यक्ष, विद्रोही साहित्य संमेलन