नागपूर महोत्सवाचे प्रणेते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून संदीप जोशी ओळखले जातात.

संदीप जोशी

महापालिकेच्या राजकारणात सत्तापक्षाकडील जे काही प्रभावी नगरसेवक सक्रिय आहेत, त्यापैकी संदीप जोशी एक आहेत. राजकीय पातळीवर पक्षात आणि पक्षाबाहेरील विरोधकांना पुरून उरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. शहराची सांस्कृतिक ओळख ठरलेल्या नागपूर महोत्सवाला त्यांच्याच प्रयत्नातून सुरुवात झाली आहे. विवेकानंदनगरचे क्रीडा संकूल ही त्यांच्याच कार्यकाळातील उपलब्धी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक म्हणून संदीप जोशी ओळखले जातात. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच त्यांचा प्रभाग येतो. तीन वेळा महापालिकेवर ते निवडून गेले. स्थायी समितीचे सलग दोन वर्षे अध्यक्ष राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेत. धडाडीचे कार्यकर्ते, आक्रमक स्वभाव आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची धडपड त्यांना नेहमीच महापालिकेत चर्चेत ठेवते. त्यांनी नागपुरात सुरू केलेला नागपूर महोत्सव असो किंवा अलीकडेच घेतलेले आरोग्य शिबीर हे त्याच्या नियोजन कौशल्यामुळे चर्चेत राहिले. सभागृहात अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पाणी कराची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांनी राबविलेली योजनाही यशस्वी ठरली होती. माजी आमदार दिवाकर जोशी यांचा राजकारणात वारसा चालवित असताना मुख्यमंत्र्यांचे खंदे समर्थक म्हणून संदीप जोशी १९९० पासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना २००२ मध्ये प्रथमच लक्ष्मीनगर प्रभागातून निवडून येत महापालिकेत प्रवेश केला. त्यानंतर २००७ मध्ये पुन्हा महापालिका सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर २०१०मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. त्याच काळात नासुप्रमध्ये विश्वस्त म्हणून काम केले. स्थायी समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर २०११-१२ मध्ये दुसऱ्यांदा स्थायी समिती अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महापालिकेच्या ५२ वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षी स्थायी समिती अध्यक्ष म्हणून निवड होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून बघितले नाही आणि महापालिकेत ज्या विभागाची जबाबदारी मिळाली ती सांभाळत असताना शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना राबविल्या. २०१२ मध्ये प्रारंभी स्थापत्य बांधकाम, विद्युत बांधकाम समिती सभापती आणि त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून जलप्रदाय विभागाचे सभापती म्हणून शहराच्या विकासाच्या दृष्टीने पाणीपुरवठा संदर्भात आणि घरोघरी नळ देण्यासंदर्भात निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी झाली. जलप्रदाय विभागाचे सभापती म्हणून शहरातील नागरिकांकडे आणि विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाकडे असलेली पाण्याच्या थकबाकीबाबत तडजोडीचा निर्णय त्यांनी घेतला आणि कोटय़वधी रुपयांची थकबाकी महापालिकेकडे जमा झाली. प्रभागात अनेक विकासकामे केली असली तरी अजूनही मलनिस्सारण वाहिनीची समस्या कायम आहे. २४ तास अखंडित पाणीपुरवठा प्रभागात सर्वच ठिकाणी सुरू झाल्याचा दावा केला आहे.

विकास कामे

  • स्थायी समिती अध्यक्ष सुरेश भट सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ
  • विकासनगर भागात साई मंदिराच्या मागे इनडोअर स्टेडियम
  • रामदासपेठ रहाटे कॉलनी ते गुरुद्वारा पीकेव्ही शेतातून मलनिस्सारण वाहिनी
  • दगडी पार्क उद्यानात विविध विकास कामे
  • तकिया, सरस्वतीनगर, फकिरवाडीमध्ये सिमेंट फ्लोरिंग
  • वसंतनगरमध्ये उद्यान
  • विविध वस्त्यांमध्ये डांबरीकरण व सिमेंटचे रस्ते
  • प्रभागातील काही भागांचाच विकास

महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले असले तरी त्यांनी प्रभागातील काही भागांचाच विकास केला आहे. प्रभागातील अनेक डांबरी रस्त्यांची अवस्था चांगली नाही. धंतोली, रामदासपेठ परिसराचा काहीही विकास झालेला नाही. या प्रभागात रुग्णालयांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र, त्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली नाही. धंतोलीतील उद्यानाची अवस्था गंभीर आहे. जलप्रदाय विभागाचे सभापती म्हणून काम केले असले तरी त्यांच्या प्रभागातील काही वस्त्यांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची समस्या आहे. गल्ल्यांचा वापर येथील नागरिकांच्या परवानगीशिवाय पार्किंगसाठी सुरू केला. निवडणुकीत या लोकांनी शब्द दिला होता की, आठवडय़ातून दोन दिवस लोकअदालत घेणार आणि लोकांच्या समस्या जाणून घेणार. या पाच वर्षांत एकही लोकअदालत झाली नाही.

मुन्ना जयस्वाल, २०१२ च्या निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sandeep joshi in nagpur politics