नागपूर : ‘उपग्रह टॅगिंग’ केलेल्या पाचपैकी दोन ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांनी राज्याची सीमा ओलांडली आहे. राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांना उपग्रह टॅगिंग केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या भ्रमणमार्गाचा पॅटर्न आणि स्वभावाची माहिती समोर आली आहे.
राज्याच्या किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणारे बहुतेक ‘ऑलिव्ह रिडले’ कासव समुद्रात सरळरेषेत जात नसल्याचे निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. जानेवारीत सर्वप्रथम उपग्रह टॅगिंग केलेल्या ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाला ‘प्रथमा’ असे नाव देण्यात आले होते. ही ‘प्रथमा’ सध्या गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर मुक्तसंचार करत आहे. प्रथमाने आतापर्यंत समुद्रातील सुमारे ३३० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. या एकमेव कासवाने सरळ मार्गात समुद्रभ्रमंती सुरू ठेवली. सध्या ती दीव किनारपट्टीपासून ६५ किलोमीटर समुद्रात आहे. ‘प्रथमा’ने सुरुवातीपासूनच खोल समुद्रकिनाऱ्याची वाट धरली होती.
‘रेवा’ हे ‘ऑलिव्ह रिडले’ कासव ‘प्रथमा’नंतर समुद्राचे सर्वात जास्त अंतर कापणारे दुसरे कासव ठरले आहे. हे कासव सुरुवातीपासूनच दक्षिणेकडील समुद्राकडे प्रयाण करत आहे. ‘रेवा’ने सुमारे ३०० किलोमीटर अंतर पार केले आहे. आता ते कर्नाटकातील कारवार शहरापासून ४० किलोमीटर समुद्रात आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून ‘लक्ष्मी’ या कासवाचा संपर्क तुटला आहे. उपग्रहातील ‘ट्रान्समीटर’ची क्षमता कमी असल्यामुळे संपर्क होत नसावा किंवा कासवाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. अथांग समुद्रात ‘लक्ष्मी’ला शोधणे जिकरीचे आहे. मात्र, ‘लक्ष्मी’शी संपर्क होईल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, ‘सावनी’ या ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाला गुहागर किनारपट्टीवर उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. मागील आठवडय़ात या कासवाने नवी मुंबईच्या समुद्र किनारपट्टीपर्यंत प्रवास केला, पण ते पुन्हा दक्षिणेकडे परतले. आतापर्यंत या मादी कासवाने सुमारे २०० किलोमीटरची समुद्रभ्रमंती केली आहे. सध्या ते अंजर्ले किनारपट्टीपासून १०० किलोमीटर आत समुद्रात आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर ‘वनश्री’ या ‘ऑलिव्ह रिडले’ कासवाला उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीपासूनच तिचे वास्तव्य गुहागर समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. आतापर्यंत तिने दक्षिणेकडे ७० ते १०० किलोमीटर प्रवास केला आहे.
दुबई, ओमान, आफ्रिकेपर्यंत जाणार!
भारतीय वन्यजीव संस्थेतील शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, ‘उपग्रह टॅगिंग’ केलेल्या चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांचा राज्याच्या उत्तर दिशेकडे प्रवास झाल्यास ते दुबई, ओमान किंवा आफ्रिकेपर्यंत प्रवास करू शकतात. तीन कासवांनी दक्षिणेकडेच प्रवास करायला पसंती दिली आहे. ‘ऑलिव्ह रिडले’ अरबी समुद्रातून हिंदी महासागरातही लक्षद्वीपपर्यंत प्रवास करतील. कदाचित उत्तरेकडे प्रयाण करणाऱ् ‘प्रथमा’ या कासवाचा प्रवासही कालांतराने दक्षिणेकडे होईल.