नागपूर: राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी प्रवेश अर्ज मागवण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना १ ते १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

शासनामार्फत सन २०२५-२६ करिता राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना चालवल्या जातात. या याेजनांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात सध्या ५६ मुला-मुलींचे ओबीसी वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावे, असे आवाहन, करण्यात आले आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांच्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना भाड्याच्या घरी राहण्यासह इतर शैक्षणिक खर्च दिला जातो.

वसतिगृह आणि आधार या दोन्ही योजनांसाठी १ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरळीत व व्यवस्थित होणेसाठी सर्व संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी सर्व संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बँकेचे खाते क्रमांक, आधार क्रमांक, बैंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करुन घेण्याची जबाबदारी गृहपालांची असेल, या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. सर्व प्रवेश प्रक्रिया गुणवत्तानिहाय व मुलां/मुलींच्या शासकीय वसतीगृहनिहाय करावी. अंतिम निवड यादीस नियमानुसार संबंधित सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी मान्यता प्रदान करावी. सर्व शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे प्रवेश सन २०२५-२६ या वर्षासाठी ऑनलाईन पध्दतीने करावेत. सदर अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर करण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

असे आहे वेळापत्रक

  • अर्ज प्रक्रिया १ ते १७ सप्टेंबर
  • अर्जांची छाननी- १९ ते २४ सप्टेंबर
  • पहिली गुणवत्ता यादी जाहीर- २५ सप्टेंबर
  • प्रवेशाची अंतिम मुदत- ०६ ऑक्टोबर
  • रिक्त जागांवर प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी- ०९ ऑक्टोबर.