केंद्रीय प्रशासकीय लवादाचा निकाल

पहिला विवाह वैध असतानाही दुसऱ्या विवाहातून अपत्य झाले असल्यास ते अनुकंपासाठी पात्र ठरते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केंद्रीय प्रशासकीय लवादाने (कॅट) सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेऊन दिला.

विनोदचे (नाव बदललेले) वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. त्यांना पहिली पत्नी आहे. दरम्यान, विनोदच्या आईशी प्रेमसंबंध निर्माण झाल्याने विनोदचा जन्म झाला. तिला दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला. पण, कायद्यानुसार पहिला विवाह वैध ठरतो. १४ जानेवारी २००५ ला वडील सेवेत असतानाच मृत्यू झाला. त्या ठिकाणी आपल्याला अनुकंपा अंतर्गत नोकरी मिळावी, याकरिता विनोदने अर्ज केला. पण, रेल्वेने त्याची विनंती अमान्य केली. त्याने रेल्वे न्यायाधीकरणात अपील केले. न्यायाधीकरणाने रेल्वे विभागाचा निर्णय कायम ठेवला. विनोदने कॅटमध्ये धाव घेतली. कॅटने सुनावणी घेतली. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर लवादाने सर्वोच्च न्यायालयातील एका निकालाचा आधार घेऊन पहिला विवाह वैध असताना दुसऱ्या विवाहातून किंवा संबंधातील अपत्यालाही अनुकंपाचा अधिकार मिळत असल्याचा निर्वाळा दिला. तसेच विनोदच्या प्रकरणात रेल्वे विभागाला नोकरीत रुजू करून घेण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.