मेडिकलच्या रक्तपेढी प्रमुखांना २ नोव्हेंबरला सुरक्षारक्षकाने केलेल्या मारहाण प्रकरणी नियुक्त चौकशी समितीने गुरुवारी तब्बल १४ कर्मचारी व अधिकाऱ्यांचे बयाण नोंदवले. मारहाण करणारा सुरक्षारक्षक वगळता इतर सगळ्यांनीच सुरक्षारक्षकाच्या विरोधात बयाण नोंदवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समितीच्या अहवालात सुरक्षारक्षक दोषी आढळणार असल्याने त्याच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मेडिकलच्या रक्तपेढी प्रमुखांनी सुरक्षारक्षकाला २ नोव्हेंबरच्या दुपारी काम सांगितले. सुरक्षारक्षकाने कमी वेतन मिळत असल्याने किती सेवा देणार, असा प्रश्न करीत थेट अधिकाऱ्यालाच मारहाण केली. अधिकाऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याबाबत रक्तपेढी प्रमुखांनी अजनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांकडूनही सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य बघत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कुंभलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ, मुख्य प्रशासकीय अधिकारी परशुराम दोरवे यांची तीन सदस्यीय समिती चौकशीकरिता गठीत केली.
समितीने गुरुवारी आरोपी सुरक्षारक्षक, फिर्यादी रक्तपेढी प्रमुखांसह घटनेच्या वेळी उपस्थित प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, बीटीओ, डॉक्टरांसह इतर असे एकूण १६ जणांचे बयाण नोंदवून घेतले आहे. सुरक्षारक्षक वगळता इतर सगळ्यांचेच बयाण सुरक्षारक्षकाच्या विरोधात गेल्याची माहिती आहे. समितीपुढे सुरक्षारक्षकानेही रक्तपेढी प्रमुखाला मारहाण केल्याचे मान्य केल्याचे व त्याला रक्तपेढी प्रमुख जबाबदार असल्याचे सांगितले आहे. याप्रसंगी रक्तपेढी प्रमुखांकडून त्याला शिविगाळ झाल्याचेही सुरक्षारक्षकाने सांगितले आहे. हा अहवाल मेडिकलच्या अधिष्ठात्यांना शुक्रवारी दिल्या जाणार आहे. त्यानंतर अहवालाची प्रत पोलिसांकडूनही घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अहवाल मिळाल्यावर सुरक्षारक्षकावर कारवाईची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. ही माहिती मेडिकलच्या एका बडय़ा अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.