सरसंघचालकांना विश्वास; ॠणाधार चॅरिटेबल ट्रस्टच्या अंकुर प्रकल्पाचे उद्घाटन
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना सरकार त्या रोखण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का येते असा प्रश्न उपस्थित करून सरकारवर अवलंबून न राहता समाजातील संवेदनशील नागरिकांनी या गोष्टीचा विचार करून समोर आले तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबी बनवण्याच्या आणि त्यांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने ऋणाधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अंकुर या प्रकल्पाचे उद्घाटन सरसंघचावलक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बीआरए मुंडले सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे प्रमुख आणि नगरसेवक संदीप जोशी, प्रमोद सराफ, डॉ. प्रमोद गिरी, दयाल मुलचंदानी, वासंती देशपांडे, प्रशांत दाणी आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या मागे आर्थिक पाठबळ नाही किंवा कोणी पाठीराखाही नाही या मानसिकतेतून अन्नदाता शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या पाठीशी समाजात सधन आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेल्या संवेदनशील व्यक्तीनी उभे राहण्याची गरज आहे. १२१ कोटींच्या देशात शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात ही देशाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. अनेकदा आपण समाजपण दाखवायला विसरलो की काय असे वाटत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयाकडे सरकारचे लक्ष असताना प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत मदत पोहचण्यासाठी लागणारा वेळ आणि त्याची कारणे काही असली तरी समाजातील संवेनशील नागरिकांनी समोर आले पाहिजे. सरकार हे आपले असून आपण त्यांना निवडून देत असतो त्यामुळे समाज म्हणून शेतकऱ्यांना साह्य़ करणे आपले कर्तव्य आहे. सरकार म्हणून काही गोष्टी करीत असले तरी समाज म्हणून आपण काही तरी करु शकताना त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
प्रत्येकाने एक गाव किंवा गावातील कुटुंब दत्तक घेऊन त्यांच्याशी संवाद ठेवला पाहिजे. या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे कुटुंब अनाथ झाले असे संबोधणे ही बाब आपल्या दृष्टीने गंभीर आहे. १२१ कोटी लोकसंख्या असलेला देशात कुणी अनाथ कसे असू शकते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. फायद्याची शेती कशी होईल या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्यासाठी काही सामाजिक संस्था काम करीत असेल तर त्यांना ज्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याची गरज आहे ते होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे असेही भागवत म्हणाले.
संदीप जोशी म्हणाले, शेतकऱ्यांभोवतीचा आत्महत्यांचा विळखा सोडवण्यासाठी अनेक संस्था करीत असताना ऋणानुबंध चॅरिटेबल संस्था त्याच उद्देशाने समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त शंभर कुटुंबीयांना दर महिना ४ हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत दिली जाणार आहे. प्रतिनिधीक स्वरुपात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते १४ महिलांना धनादेश देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2016 रोजी प्रकाशित
संवेदनशील नागरिकांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील
संवेदनशील नागरिकांनी या गोष्टीचा विचार करून समोर आले तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही,
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-01-2016 at 02:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensitive public initiative can stop farmers suicide