नागपूर : करोनाची तिसरी लाट सौम्य असेल असे सांगितले जात असतानाच दैनंदिन मृत्यूसंख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी ठरत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात चोवीस तासात तब्बल सात मृत्यू नोंदवले गेले. ते सर्व शहरातील आहेत. तिसऱ्या लाटेत एका दिवसातील मृत्यूची आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. याशिवाय जिल्ह्यात ४७६३ नवे करोनाबाधित सापडले असून त्यात ग्रामीणमधील ९६३ तर जिल्ह्याबाहेरील १११ रुग्णांचा समावेश आहे.

तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असली तरी सुरुवातीच्या काळात दैनंदिन मृत्यूची संख्या कमी होती. मात्र काही दिवसात त्यात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी ५ मृत्यू होते. गुरुवारी ६ झाले आणि शुक्रवारी ही संख्या सातवर गेली. त्यापैकी दोघांचे अहवाल मृत्यूनंतर नमुने घेतल्यानंतर सकारात्मक आले. यापैकी एकाचा अपघाती मृत्यू झाला होता तर दुसऱ्याने आत्महत्या केली होती. तीन मृत्यू ७० वर्षांवरील वयोगटातील आहे. यापैकी दोघांनी लस घेतल्या नव्हत्या. इतर दोघांची माहिती मिळू शकली नाही. शुक्रवारी एकूण ४७६३ नवे बाधित सापडले. गुरुवारी ही संख्या ४ हजार ४२८ होती. दिवसभरात एकूण १३,०९३ चाचण्या झाल्या. त्यात शहरात ९६६२ तर ग्रामीणमध्ये ३४३१ होत्या. सक्रिय रुग्णसंख्या २१,७१९ वर गेली तर एक दिवसात १७१६ रुग्णांना करोनावर मात केली.

विदर्भात ६ मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपूर वगळता विदर्भात २४ तासांत वर्धा येथे २, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ६ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. गुरुवारीसुद्धा एवढेच मृत्यू झाले होते. दिवसभरात ३,७८६ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. त्यात अमरावती ५२५, चंद्रपूर ६०७, गडचिरोली २२१, यवतमाळ ३६८, भंडारा ४०९, गोंदिया २१०, वाशीम १५५, अकोला ३९७, बुलढाणा ३९३, वर्धा जिल्ह्यातील ५०१ रुग्णांचा समावेश होता.