यवतमाळमध्ये ‘वजनदार’ तानाजी सावंत यांच्या उमेदवारीवर युतीची सारवासारव
उस्मानाबादमध्ये शिवजलक्रांतीचे काम केल्याने आत्महत्या कमी झाल्या. आता यवतमाळमध्येही तोच प्रयोग करण्याच्या उद्देशानेच मराठवाडय़ातील शिक्षणसम्राट तानाजी सावंत यांना विधान परिषद निवडणुकीसाठी यवतमाळमध्ये उभे केल्याचा शिवसेनेचा युक्तिवाद आहे. मात्र मोठे आर्थिक बळ असल्यानेच सावंत यांना उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मूळचे उस्मानाबादचे असलेले सावंत हे मराठवाडय़ातील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जातात. चार साखर कारखाने पदरी असलेल्या सावंत यांच्या ८७ शिक्षण संस्था आहेत. शिवसेनेचे उपनेते असलेल्या सावंत यांनी जलयुक्त शिवारला छेद देण्यासाठी सेनेच्या शिवजलक्रांतीच्या माध्यमातून मराठवाडय़ात काम सुरू केले आहे.
सावंत यांनी शिवजलच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तीन तालुक्यांत आत्महत्या रोखल्या. आता हाच प्रयोग यवतमाळात राबवण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा दावा भाजपचे मदन येरेवार व सेनेच्या संजय राठोड या मंत्र्यांनी केला. मात्र केवळ विजय मिळवणे याच निकषावर सावंत यांना मराठवाडय़ातून आयात करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता घोडाबाजारात तेजी येणार अशी चर्चा यवतमाळात सुरू झाली आहे. त्यामुळे मग भाजप-सेनेकडून सारवासारव करण्यात आली.
विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतांची खरेदी-विक्री सर्रास होते हा अनुभव सार्वत्रिक आहे. त्यात कंत्राटदार, शिक्षण व साखरसम्राटांना उमेदवारी देण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. आता सावंत यांच्या उमेदवारीला शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी जोडण्याचा खेळ युतीकडून सुरू आहे.
विधान परिषदेसाठी बाहेरचा उमेदवार देण्याचे प्रकार याआधीही घडले आहेत. १२ वर्षांपूर्वी चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी या पक्षाने भुसावळचे वादग्रस्त आमदार संतोष चौधरींना तिथे पाठवले होते. त्यांच्या समर्थकांनी तेव्हा ११ नगरसेवकांची धुलाई केल्याचे प्रकरण गाजले होते. तेव्हा तडसांचा पराभव करून काँग्रेसचे जैनुद्दीन जव्हेरी निवडून आले होते.