अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कंत्राटी संगणक चालक पदावर कार्यरत महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत येथील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्षांनी त्याची दखल घेतली नाही. विधानसभा अध्यक्ष देखील ‘मॅनेज’ झाल्याचा गंभीर आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यालयात कंत्राटी संगणक चालक पदावर एक महिला कार्यरत आहे. दरम्यान, कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी संगणक चालक महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेने तसे गंभीर आरोप त्या दोन अधिकाऱ्यांवर केले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी घेतली. या दोन्ही अधिकाऱ्यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.
नितीन देशमुख हा मुद्दा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील उपस्थित करणार होते. त्यासाठी त्यांनी सभागृहात चर्चा होण्यासाठी लक्षवेधीचा प्रस्तावसुद्धा दिला होता. या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती, मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. आरोपी असलेले अधिकारीच तसेच सांगत असल्याने आपल्याला विधानसभा अध्यक्षांवर देखील संशय असल्याचा नितीन देशमुख म्हणाले. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता एका बहिणीच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन करीत असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले.
कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वारंवार तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेतल्या जात नसून पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नाही. आरोपी अधिकाऱ्याला एका आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेवरील अन्याय विरोधात आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले असून थेट विधानसभा अध्यक्षांवर देखील त्यांनी गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.