अनिल कांबळे

नागपूर : पत्नीला ब्रेन ट्यूमर असल्यामुळे पतीने दुसरीशी प्रेमविवाह केला. दोन्ही पत्नी एकमेकींसोबत गुण्यागोविंदाने राहू लागल्या. मित्राच्या सांगण्यावरून आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे संसार तुटण्याच्या काठावर आला. मात्र, भरोसा सेलने पतीच्या डोक्यातील संशयाचे भूत दूर केल्याने दोघांचा संसार पुन्हा सुरळीत करण्यात यश मिळवले.

संजय (४५) हा मूळचा मध्यप्रदेशातील बालाघाटचा असून पत्नी नम्रता आणि दोन मुलांसह कामाच्या शोधात नागपुरात आला. तो लकडगंजमधील एका हॉटेलमध्ये मिठाई बनविण्याच्या कामावर लागला. सर्व काही सुरूळीत सुरु असताना नम्रताला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. आजारी पत्नीकडून घरातील कामधंदा होत नव्हता तसेच ती मुलांकडेही व्यवस्थित लक्ष देऊ शकत नव्हती. तरीही दोघांचाही संसार कसाबसा सुरु होता. यादरम्यान, त्याची ओळख अंजली (२२, बदललेले नाव) हिच्याशी झाली. अंजलीचे लग्न झाले होते, मात्र, दारुड्या पतीमुळे ती माहेरी परत आली होती. ती संजयच्या पत्नीला नेहमी घरकामात मदत करीत होती तसेच तिला दवाखान्यातही नेत होती.

हेही वाचा >>> धक्कादायक! महिला डॉक्टरचा विमानात विनयभंग

स्वभावाने चांगल्या असलेल्या अंजलीवर संजयचा जीव जडला. नेहमी घरी ये-जा करणाऱ्या अंजलीशी नम्रताचेही पटत होते. संजय आणि अंजली या दोघांत जवळीक निर्माण झाली. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. संजयने पत्नीशी चर्चा करून अंजलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. तिने लगेच होकार देत अंजलीला विचारणा केली. अंजलीनेही होकार दिला. दोघांनी कुटुंबियांच्या संमतीने एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केले. नम्रता, दोन मुले आणि संजय-अंजली यांच्यात व्यवस्थित संसार सुरु होता. अंजली आठ महिन्यांची गर्भवती झाली. घरात लवकरच पाळणा हलणार होता.

सुखी संसारात मित्राने टाकला मिठाचा खडा

२२ वर्षीय अंजलीवर संजयचा एक मित्र एकतर्फी प्रेम करीत होता. तो अंजलीच्या प्रेमाच्या मागे लागला होता. मात्र, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे चिडलेल्या मित्राने संजयचे कान भरले. ‘तुझी पत्नी माझ्याशी बोलते आणि तिला मी आवडतो,’ असे सांगितले. संजयच्या मनात संशयाचे भूत घुसले. त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरोसा सेलमध्ये मिटला वाद

अंजलीने भरोसा सेलमध्ये पतीविरुद्ध तक्रार केली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी पतीला बोलावले. प्रेमलता पाटील यांनी पती-पत्नीचे समूपदेशन केले. त्या मित्राला बोलावण्यात आले. त्याने एकतर्फी प्रेमामुळे संसारात विघ्न घातल्याची कबुली दिली. संजयच्या मनातून संशयाचे भूत उतरले. त्यामुळे संजय-अंजलीचा पुन्हा संसार फुलला.