बस्तरमधील चळवळीतील वरिष्ठांचे धाबे दणाणले
चळवळीचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या बस्तरमध्ये नक्षलवाद्यांच्या विरोधात गेल्या शनिवारी निघालेल्या निषेध मोर्चात ६० हजारापेक्षा जास्त स्थानिक नागरिक सहभागी झाल्याने या चळवळीतील वरिष्ठांचे धाबे दणाणले आहे.
देशभरात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव छत्तीसगडमधील बस्तर विभागात आहे. या चळवळीचे मुख्यालय याच विभागातील अबूजमाड पहाडावर असून अनेक मोठे नक्षल नेते या भागात कायम वास्तव्य करून असतात. या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या विरोधात सध्या सक्रिय असलेल्या ‘अग्नी’ या संस्थेने आयोजित केलेल्या ललकार मोर्चात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाल्याने नक्षलवाद्यांचे वर्तुळ अस्वस्थ झाले आहे. या संस्थेने शनिवारी बस्तर विभागाचे मुख्यालय असलेल्या जगदलपूरला या मोर्चाचे आयोजन केले होते. यात स्थानिक नागरिकांनी, तसेच दुर्गम भागातील आदिवासींनी मोठय़ा संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे पदाधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दुर्गम भागातील आदिवासी यात सहभागी होणार नाही, असा अंदाज अनेकांनी बांधला होता. याशिवाय, नक्षलवाद्यांनी सुद्धा गावागावात सभा घेऊन या मोर्चात सामील व्हाल तर खबरदार, असा दम भरला होता. प्रत्यक्षात स्थानिकांनी, तसेच दुर्गम भागातील आदिवासींनी नक्षलवाद्यांच्या या दबावाला बळी न पडता या मोर्चात मोठय़ा संख्येत सहभाग नोंदवला.
निरपराध आदिवासींच्या हत्या थांबवा, असे नारे देत दुर्गम भागातील हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले होते, असे ‘अग्नी’चे अध्यक्ष अॅड. आनंदमोहन मिश्रा यांनी सांगितले. बस्तर पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या मोर्चात ६० हजारापेक्षा जास्त लोक होते. बस्तर विभागात प्रथमच मोठय़ा संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याने नक्षलवाद्यांच्या वर्तुळात यावर आता गंभीर मंथन सुरू झाले आहे. याआधी अनेक संस्थांनी असे मोर्चे काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याला स्थानिकांकडून प्रतिसाद मिळालेला नव्हता. गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांनी एका ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या केली. त्याचा विरोध म्हणून या समुदायाच्या वतीने जगदलपूरला मेणबत्ती मोर्चा काढला होता. त्यानंतर हा मोर्चा निघाल्याने नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहे, तर पोलिसांचा हुरूप वाढला आहे.