पंडित नेहरूंचा एकेरी उल्लेख; बांगलादेशातील हिंसेचा ठपका इंदिरा गांधींवर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वादग्रस्त ‘विद्यार्थी संसदे’च्या उद्घाटनीय सोहळ्यादरम्यान महापौर दयाशंकर तिवारी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. इतकेच नव्हे तर बांगलादेशाला भारतात विलीन करण्याचा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सल्ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी न ऐकल्यामुळेच आज बांगलादेशात हिंदूचे हत्यासत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थी संसदेमधून पुन्हा एकदा आयोजकांचा छुपा अजेंडा उघड झाल्याचा आरोप होत आहे.

महापालिकेच्या श्रीमंत राजे रघुजीराव भोसले नगरभवन सभागृहामध्ये २६ ते ३० ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी या संसदेच्या उद्घाटनादरम्यान महापौरांनी काँग्रेस सरकारच्या काळातील पंतप्रधानांच्या विविध धोरणांवर टीका करीत देशाच्या अधोगतीला ते कसे जबाबदार आहेत, हे वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न केला.

लोकशाहीमध्ये केवळ सक्षम विरोधक नाही तर सकारात्मक  विपक्ष राहणेही आवश्यक आहे.  मात्र, दुर्दैवाने आजचे विरोधक हे केवळ आरोप करतात.

सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सकारात्मक प्रतिसाद देत नाही, असा आरोप त्यांनी केला. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशाचे विभाजन केले. यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा सरकारचे समर्थन केले होते. संसदेमध्ये इंदिरा गांधी यांना ‘रण-चंडी’ अशी उपाधीही दिली होती. बांगलादेशाला भारतात म्हणजे बंगालमध्ये विलीन करण्याचा सल्लाही वाजपेयींनी दिला होता. परंतु, इंदिरा गांधींनी वाजपेयींचा सूचना दुर्लक्षित केल्यामुळेच आज बांगलादेशामध्ये हिंदूंना दहशतवादी हल्ल्यांचा सामना करावा  लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.   नेहरूंच्या चुकांमुळेच चीनशी वाद 

पंडित नेहरूंच्या चुकांमुळेच भारत-चीन युद्धादरम्यान भारताने आपल्या जमिनीचा मोठा हिस्सा गमावला. नेहरूंच्या उदारमतवादी धोरणांमुळे त्यावेळी भारतीय सैनिकांचे हौतात्म्य दडपण्यात आले. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या धोरणांना सक्षम विरोधी पक्षेनेता म्हणून वाजपेयींनी  हाणून पाडले होते, असेही दयाशंकर तिवारी यांनी सांगितले.

एकाच विचारधारेच्या मान्यवरांची मांदियाळी

मंगळवारी विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनादरम्यान व्यासपीठावर एकाच विचारधारेच्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. महापौर दयाशंकर तिवारी हे भाजपचे तर समय बनसोड, विष्णू चांगदे आणि टारझन गायकवाड हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आहेत. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू संजय दुधे आणि विद्यार्थी कल्याण संचालक अभय मुदगल हे भाजप प्रवर्तित शिक्षण मंच या संघटनेशी संबंधित आहेत. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले नव्हते. यावेळी झालेल्या भाषणांमधून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या धोरणांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित वादग्रस्त ‘विद्यार्थी संसदे’च्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान मूळ उद्देशाला तडा गेल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.