उपराजधानीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना केल्या जाणाऱ्या मदतीचा ओघ मंदावला आहे. वर्ष २०१८ च्या तुलनेत वर्ष २०१९ मध्ये निम्या रकमेचीच मदत दिल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक पुढे आले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून शासनाच्या कोणत्याही योजनेत न बसणाऱ्या राज्यातील गरीब अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातही यासाठी कार्यालय सुरू केले होते. त्यांच्या काळात मोठय़ा प्रमाणात गरजूंना मदत देणे सुरू झाले.
राज्यात सत्तापरिवर्तनानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेही हे कार्यालय सुरू ठेवले. दरम्यान, अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, २०१७ या वर्षांत नागपूरच्या या कार्यालयातून १,५४२ जणांना १८ कोटी ७५ लाख ५९ हजार ५०० रुपयांची मदत करण्यात आली होती. २०१८ मध्ये मदतीची व्याप्ती वाढत २,१९३ जणांना तब्बल २१ कोटी ३ लाख ७ हजारांची मदत केली गेली. १ जानेवारी ते ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये मात्र रुग्ण कमी होवून १,५४७ जणांना ११ कोटी ४ लाख ८९ हजार रुपयांची मदत करण्यात आली. १८ डिसेंबर ते २७ जानेवारी २०२० मध्ये १५१ रुग्णांना ९० लाख ८५ हजार रुपयांची मदत केली गेली. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत मोठय़ा संख्येने या मदतीचा ओघ कमी झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.