नागपूर : भारतातच नाही तर जगभरात वन्यजीव गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून वाघासह अस्वल, पँगोलीन, कासव, पक्षी आणि इतर वन्यप्राण्यांच्या प्रजातीच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जगातील अनेक प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे. १४९ देशांमधून गेल्या काही वर्षांत सुमारे १ लाख ८० हजार वन्यप्राण्यांची अवयव जप्तीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राइम’च्या जागतिक वन्यजीव गुन्हे अहवालात वन्यजीव तस्करीमुळे निसर्ग आणि जैवविविधतेला धोका असल्याचे नमूद केले आहे. अहवालात पँगोलीन हा जगातील सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी असल्याचे नमूद आहे. पँगोलीन जप्तीमध्ये सुमारे दहापट वाढ झाली आहे. तर १९९९ ते २०१९ या २० वर्षांत सुमारे सहा हजार प्रजातीचे अवयव जप्त करण्यात आले.

करोनाकाळातही वन्यजीवांची शिकार आणि तस्करीचे प्रमाण कमी झाले नाही. वन्यजीव गुन्हेगारी जैवविविधता, मानवी आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक-आर्थिक विकासावर होणाऱ्या परिणामांमुळे सर्व देशांना प्रभावित करते. वन्यजीव प्रजातींची तस्करी थांबवणे हे केवळ जैवविविधता आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी नव्हे तर भविष्यातील सार्वजनिक आरोग्य आणीबाणी टाळण्यासाठी मदत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या अहवालात जागतिक वन्यजीव गुन्हेगारीचा कल कोणत्या दिशेने आहे तसेच हस्तीदंत, गेंडय़ाचे शिंग, सरपटणारे प्राणी, वाघ आदीच्या बाजारातील व्यापाराबाबत सांगितले आहे. अफ्रिकेतील हत्तीच्या दातांची आणि गेंडय़ांच्या शिंगांची मागणी कमी होत आहे. तर वाघांच्या अवयवांची मागणी वाढली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या प्रमाणात वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वन्यप्राण्यांची शिकार केल्यानंतर अवयवांची विक्री केली जाते, तेव्हा प्राण्यांपासून मानवामध्ये होणाऱ्या रोगाच्या प्रमाणातही वाढ होते. सर्व उदयोन्मुख संसर्गजन्य रोगांपैकी ७५ टक्के रोग याच कारणामुळे होतात. त्यात करोनाचाही समावेश आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.